तरुण ठरताहेत भरधाव वेगाचे बळी; वर्षभरात ५१ टक्के मृत्यू दुचाकी अपघाताचे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:03 AM2020-12-04T03:03:07+5:302020-12-04T03:03:20+5:30
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १७२ जणांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. मुंबईत १ लाख नागरिकांमागे १० हजार वाहने २०११ ते २०१९ दरम्यान नोंद झाली.
मुंबई : वेगाची नशा तरुणाईच्या जीवावर बेतत असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडे नोंद होत असलेल्या अपघातांच्या घटनांतून समोर येत आहे. त्यात, विनाहेल्मेट असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षभरात भरधाव दुचाकीच्या अपघातामुळे ५१ टक्के मृत्यू झाले आहेत.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १७२ जणांचा रोड अपघातात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. मुंबईत १ लाख नागरिकांमागे १० हजार वाहने २०११ ते २०१९ दरम्यान नोंद झाली. रोड अपघाताला भरधाव दुचाकीस्वार सर्वाधिक कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. यात ४७ टक्के पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. यात रोड अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ८० टक्के पुरुष तर २० टक्के महिलांचा समावेश होता. तर जखमींमध्येही ७५ टक्के पुरुषांचा समावेश आहे. भरधाव दुचाकीच्या अपघातामुळे ५१ टक्के मृत्यू झाले आहेत. यात १५ ते २९ वयोगटातील तरुणाईचा समावेश होता. परिमंडळ ६ आणि ७ मध्ये सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
मुंबईतले हे जंक्शन ठरताहेत धोकादायक...
अमर महल जंक्शन आणि विक्रोळीतील गोदरेज जंक्शन अपघाताचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यात तीन वर्षांत १२० अपघाताच्या घटनांची नोंद झाली आहे. मुंबईतल्या १५ जंक्शनवर गेल्या ३ वर्षात सर्वाधिक अपघात घडल्याचे दिसून आली. अमर महल जंक्शन येथे २०१७ ते २०१९ दरम्यान अपघातात २५ जणांचा बळी गेला. तर २०१८ ते २०१९ मध्ये ४० जण जखमी झाले. तर विक्रोळीच्या गोदरेज जंक्शन परिसरात १८ बळी आणि ४२ जण जखमी झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईत रोड अपघातात मृत्यू
जानेवारी ७६
फेब्रुवारी ७३
मार्च ८०
एप्रिल ७४
मे ६१
जून ८८
जुलै ६५
ऑगस्ट ६४
सप्टेंबर ६१
ऑक्टोबर ७२
नोव्हेबर ८९
डिसेंबर ७३