अवघ्या १० रुपयांमुळे तरुणाने गमावला जीव
By Admin | Published: July 27, 2016 02:37 AM2016-07-27T02:37:53+5:302016-07-27T02:37:53+5:30
भाड्यापेक्षा १० रुपये जास्त घेतल्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये वाद होऊन याच वादानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणारी रिक्षा पलटल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची
मुंबई : भाड्यापेक्षा १० रुपये जास्त घेतल्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकामध्ये वाद होऊन याच वादानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणारी रिक्षा पलटल्याने या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीत घडली आहे. चेतन आचर्णेकर (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
विक्रोळीतील गोदरेज कॉलनीत राहणाऱ्या कुटुंबात वाढलेल्या चेतनने नुकताच पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. आई, वडील आणि लहान भाऊ असे त्याचे कुटुंब. वडील गोदरेजमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. चेतन नोकरीच्या शोधात असताना कामानिमित्त गोवा येथे गेला होता. त्यानंतर रात्री १०च्या सुमारास तो सांताक्रुझ विमानतळावर उतरला. घरी जाण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. रिक्षाचालक कमलेश गुप्ताच्या रिक्षातून तो विक्रोळीत गोदरेज कॉलनी येथे उतरला. रिक्षाचे भाडे १७२ झाल्याने तो पैसे घेण्यासाठी घरी आला. त्याने रिक्षाचालकाला दोनशे रुपये दिले. वर सुटे दोन रुपयेही दिले. मात्र रिक्षाचालकाने ३० रुपये परत देण्याऐवजी २० रुपयेच हातात टेकवले. १० रुपये परत देण्यासाठी चेतनने गुप्तासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र आपल्याकडे सुटे पैसे नाहीत, असे सांगून गुप्ताने त्याला पैसे देण्यास नकार दिला. पैसे घेऊन गेलेला चेतन बराच वेळ होऊनही घरी आला नाही म्हणून त्याचे वडील त्याच्याकडे आले. तेव्हा बाबांनी त्याला विचारले असता, ‘पप्पा... पाहा ना हा १० रुपये जास्त घेत आहे. वडिलांनीही त्याला वाद नको करू, असे सांगून तेथून निघण्यास सांगितले. मात्र आपण जास्त पैसे का द्यायचे? या विचाराने त्याने रिक्षाचालकासोबत वाद सुरूच ठेवला. अखेर वडिलांनीही गुप्ताला जाण्याचा सल्ला दिला. मात्र चेतनने रिक्षाला घट्ट धरून ठेवले होते. अशातच गुप्ताने रिक्षासह पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात रिक्षा पलटी झाली. खाली कोसळलेला चेतन रिक्षाखाली येऊन जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. वडिलांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)
वडिलांना धक्का
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच चेतनचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेने चेतनच्या वडिलांना धक्का बसला आहे. आचर्णेकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.