तरुणांनी उठविला जैवविविधतेसाठी ‘आवाज’
By admin | Published: June 27, 2017 03:44 AM2017-06-27T03:44:22+5:302017-06-27T03:44:22+5:30
मुंबईतील समुद्रकिनारे प्रदूषणाने ग्रासलेले पाहायला मिळतात. किनारपट्टीवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग आढळतात. तरीसुद्धा प्रदूषणावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील समुद्रकिनारे प्रदूषणाने ग्रासलेले पाहायला मिळतात. किनारपट्टीवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग आढळतात. तरीसुद्धा प्रदूषणावर मात करून सागरी जीव तग धरून आपले जीवन जगत आहेत. समुद्राच्या तळाशी विविध प्रकारचे खडक, सी हॉर्स, पाइप फिश, स्टार-फिश, जिवंत प्रवाळ, लॉबस्टर, खेकडे, मडस्कॅब, आॅक्टोपस, शंख-शिंपले, समुद्री गोगलगार्इंच्या विविध प्रजाती असे जीव आढळतात. मुंबईत भार्इंदर, गिरगाव, हाजीअली आणि गेटवे आॅफ इंडिया इत्यादी ठिकाणी जैवविविधता दिसून येते. जैवविविधतेला वाचविण्यासाठी मुंबईतील ‘मरिन लाइफ आॅफ मुंबई गु्रप’मधील समुद्रीजीव अभ्यासक अभिषेक साटम, सागरी परिसंस्थेचे अभ्यासक प्रदीप पाताडे आणि अभिषेक जमालाबाद या तरुणांनी विडा उचलला आहे. या गु्रपच्या माध्यमातून पर्यटकांना सागरी जिवांबाबत माहिती दिली जात आहे. दरम्यान, मुंबईतील समुद्रकिनारे या जीवसृष्टीसाठी पोषक नाहीत, परंतु त्यांनी परिस्थितीशी जुळवून या ठिकाणी आपली वाढ केली आहे. या बाबतीत संशोधन होणे गरजेचे आहे. विकासकामांसाठी समुद्राच्या ठिकाणी बांधकाम होताना दिसते, पण या जीवसृष्टीचा विचार करणे जरुरीचे आहे. येत्या काही वर्षांत जीवसृष्टी कायमची नष्ट होईल. यासाठी सागरी जैवविविधतेचे संरक्षण होणे गरजेचे आहे, असे अभिषेक साटम यांनी सांगितले.