तरुणांनो, धीर न सोडता ध्येयाकडे वाटचाल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:05 AM2021-07-05T04:05:42+5:302021-07-05T04:05:42+5:30
शिवदीप लांडे यांचे कळकळीचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केवळ एखाद्या नोकरीतील परीक्षेत अपयश आले म्हणून आपले ...
शिवदीप लांडे यांचे कळकळीचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केवळ एखाद्या नोकरीतील परीक्षेत अपयश आले म्हणून आपले आयुष्य संपत नाही. युवकांनी अशी कितीही संकटे आली तरी न डगमगता आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवावी, असे आवाहन महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाचे (एटीएस) उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी केले आहे.
एमपीएससी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयपीएसमधील खराखुरा ‘मराठी सिंघम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट करीत तरुणाईला आवाहन केले आहे. आपले स्वतःचे अनुभव शेअर करीत त्यांनी तरुणांनी आपले बहुमूल्य आयुष्य वाया घालवू नये असे त्यात नमूद केले असून, त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यावर लाईक व कॉमेंटस्चा पाऊस पडत आहे.
आपल्या आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात, की त्यावेळी आपल्याला वाटते की, आपण आता थकलो आहोत, आपले काहीही चांगले होणार नाही; पण आपली कसोटीची वेळ असते, त्यावेळी न खचता कार्यरत राहिल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. मला आयुष्यात अनेक वेळा अशा परिस्थितीतून जावे लागले आहे; पण मी हार मानली नाही, मला जरी सरकारी नोकरी मिळाली नसती तरी मी कोणताही उद्योग करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली असती; कारण आपल्या आयुष्यावर घरच्याचाही अधिकार असतो. त्यामुळे प्रत्येक पराभवातून शिकत पुढे जायला हवे; कारण आयुष्य खूप सुंदर आणि आशादायक आहे, असेही लांडे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.