मुंबई - देशातील ७० टक्के तरुणांना भाड्याच्या घरात राहण्याचा कंटाळा आला आहे. त्यांना येत्या २ वर्षांत स्वत:चे घर खरेदी करण्याची इच्छा आहे. तरुणांच्या मतप्रवाहात हा माेठा बदल यावेळी दिसून येत आहे. रिअल इस्टेट सल्ला संस्था ‘सीबीआरई साऊथ एशिया’ने केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात भारतासह जगभरातील २० हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, भारतातील १८ ते ४१ या वयोगटातील ४५ टक्के तरुणांनी शहरांतील नव्या घरात जाण्यास पहिली पसंती दिली आहे. गेल्या वेळच्या सर्वेक्षणात लोक याउलट भाड्याच्या घरास पसंती देत होते.
आता लोक मालमत्तांचा दर्जा आणि वातावरण यालाही विशेष महत्त्व देत आहेत. त्यामुळे विकासकांना रिमोट वर्किंग इन्फ्रास्ट्रक्चर, इंटिरियर डिझाईन आणि अधिक चांगले आऊटडोअर यांसारख्या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. - अंशुमान मॅगजीन, चेअरमन व सीईओ, सीबीआरई इंडिया