मुख्यमंत्र्यांबाबत तरुणाचे आक्षेपार्ह ट्विट; आरोपीला अहमदनगर येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:29 AM2022-10-31T05:29:31+5:302022-10-31T05:29:58+5:30
पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नये म्हणून त्याने ट्वीट करण्यासाठी सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट तसेच व्हीपीएनचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याविरोधात शिवीगाळ करत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या आरोपीला अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. गणेश गोटे (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नये म्हणून त्याने ट्वीट करण्यासाठी सार्वजनिक वायफाय, हॉटस्पॉट तसेच व्हीपीएनचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने एका ट्विटटर हॅन्डलवरून एक व्यक्ती मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री, महिला खासदार, महिला पत्रकार यांच्याबाबत शिवीगाळ करुन अपमानास्पद, लज्जास्पद, आपत्तीजनक मजकूर ट्विट करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
२ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २८ ऑक्टोबर रोजी धाड टाकून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणून केलेल्या चौकशीत गणेश नारायण गोटे (२९) याला अटक करण्यात आली आहे. तपासात दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण करून संशयिताने प्रसारित केलेला मजकूर आणखी कोणाकडून तयार करुन घेतला आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले. न्यायालयाने गोटे याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.