Join us

तरुण शिक्षकांची मते विभागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:22 AM

शिक्षक आमदार निवडणूक : शिक्षक भारतीविरोधात जुनी हक्क पेन्शन संघटना

मुंबई : नव्या पेन्शन योजनेविरोधात लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनेने मुंबईतील शिक्षक आमदार निवडणुकीत आपला उमेदवार जाहीर केल्याने शिक्षक भारतीसमोरील अडचणींत वाढ झाली आहे. सध्या मुंबईत शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील असून त्याविरोधात संघटनेने दिलेल्या उमेदवारामुळे तरुण शिक्षकांची मते विभागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जुनी पेन्शन हक्क संघटनेने या निवडणुकीत मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांच्या गळ्यात उमेदवाराची माळ घातली आहे. २००५ सालानंतर शासन सेवेतील कर्मचाºयांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्याविरोधात या संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी, मोठ्या संख्येने तरुण शिक्षक संघटनेच्या पाठीशी आहेत. सुरुवातीला नवीन अंशदायी पेन्शन योजनेविरोधात अनभिज्ञ असलेले कर्मचारी २०१३ सालानंतर मोठ्या संख्येने या योजनेविरोधात लढा देताना दिसत आहेत. हजारोंच्या संख्येने मोर्चे काढणाºया या संघटनेने प्रथमच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने प्रस्थापितांना धक्का बसल्याची चर्चा आहे. कांबळे यांनी सांगितले की, जुन्या पेन्शन योजनेसह अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर आहे. रात्रशाळेतील शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार कायम आहे. शालार्थ प्रणालीचा घोळ, वेळेवर न होणारे पगार यांसारखे अनेक ज्वलंत विषय मांडून ते मार्गी लावण्यात शिक्षक आमदारांना अपयश आले आहे. त्यामुळे जुनी पेन्शन हक्क संघटना स्वत:चे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली आहे.मते विभाजनाचा फायदा कुणाला?जुनी हक्क पेन्शन संघटनेच्या उमेदवारामुळे शिक्षक भारतीच्या पाठीशी असलेल्या बहुतेक मतांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे. याशिवाय शिक्षक भारतीला शिक्षक परिषदेच्या उमेदवाराचे कडवे आव्हान असेल. त्यामुळे भविष्यात कुणाच्या मतांमध्ये फूट पडणार, तरुण शिक्षकांची मते कोणाकडे विभागली जाणार आणि त्याचा फायदा कोणाला होणार, याचीच चर्चा शिक्षकांमध्ये रंगली आहे.

टॅग्स :शैक्षणिक