\Sप्रियकराच्या मदतीसाठी तरुणीचा घरात डल्ला
आठ लाखांचे दागिने पळवले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रियकराची पैशांची गरज भागविण्यासाठी एका तरुणीने घरातच ८ लाखांचा डल्ला मारल्याचा प्रकार अंधेरीत घडला. याप्रकरणी तिच्यासह प्रियकराला शुक्रवारी आंबोली पोलिसांनी अटक केली.
फिजा शेख आणि नुरुद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. फिजाकडून साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत करण्यात आले. ती वीरा देसाई रोड परिसरात राहते. दिवाळीदरम्यान पाहुण्यांची ऊठबैस करण्यात शेख कुटुंबीय व्यस्त होते. त्यावेळी फिजाने तिची आई लालबी यांचे आठ लाखांचे दागिने पळविले. लाॅकरमधील दागिने गायब झाल्याचे समजताच आईने आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात फिजा आणि नुरुद्दीनने गुन्ह्याची कबुली दिली. नुरुद्दीनला पैशांची गरज असल्याने दागिने चोरल्याचे फिजाने सांगितले. यापूर्वीही तिने घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली.
................................................