मुंडे यांच्या मेहुण्याचीही पोलिसांत तक्रार, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याबाबत विचार
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणीच चौकशीच्या घेऱ्यात
मुंडे यांच्या मेहुण्याचीही पोलिसांत तक्रार : चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याबाबत विचार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार तरुणीच चौकशीच्या घेऱ्यात अडकली आहे. मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रारदार तरुणीविरुद्ध गेल्यावर्षी तक्रार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व प्रकरणांच्या चौकशीअंती मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करायचा की नाही हे ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुरुषोत्तम केंद्रे हे धनंजय मुंडे यांचे मेहुणे असून, पुण्यात त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. तक्रारदार तरुणी ही मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे मुंडे हे तणावात होते. गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी ही तक्रार वांद्रे पोलिसांकडे करण्यात आल्याचे केंद्रे यांनी सांगितले. यात, तक्रारदार तरुणीसह तिची बहीण आणि भावाविरोधातही तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी मात्र अद्याप कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.
१५ एप्रिल, २०१९ रोजी तक्रारदार तरुणीने नामांकित विमान कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या रिझवान कुरेशी यांच्याकडेही शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात अंबोली पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर भाजप नेते कृष्णा हेगडेंपाठाेपाठ शुक्रवारी मनसे नेते मनीष धुरी यांनीही अंबोली पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यांनीही तक्रारदार तरुणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
......................
....
आधी चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्याचा विचार...
एसीपी ज्योत्स्ना रासम या याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यात तरुणीविरोधात समोर येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांच्या सखोल चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तरी मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकड़ून मिळते आहे.
...