तरुणी म्हणे मी राजकीय षडयंत्राची बळी ठरत होते,
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीची माघार
राजकीय षडयंत्राचा बळी ठरल्याचा आराेप : तक्रार मागे घेत असल्याचे केले ट्विट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आराेप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारण तसेच या तक्रारीमुळे होत असलेल्या राजकारणामुळे माघार घेत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. शुक्रवारी याबाबत ट्विट करून त्यात मुंडे यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे तिने नमूद केले.
तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला हाेता, तर गेल्यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी मुंडे यांचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही तक्रारदार तरुणीविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तरुणी मुंडे यांना अनेक वर्षांपासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे मुंडे हे तणावात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.
तत्पूर्वी १५ एप्रिल, २०१९ रोजी तक्रारदार तरुणीने नामांकित विमान कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या रिझवान कुरेशी यांच्याकडेही शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी अंबोली पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून, तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असे ट्विट तिने केले होते. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी ट्विट करून तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले.
* माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न
माझी बहीण आणि मुंडे यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यात कोर्ट प्रकरण सुरू असल्याने मानसिक ताण आणि दबाव वाढला. मुंडे यांच्याविरोधात गेल्यानंतर मी राजकीय षडयंत्राची शिकार होत असून, काही जण माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधत असल्याचे लक्षात आले. हे सगळे चुकीचे आहे. मी माझ्या घरातील कुठल्याही व्यक्तीचे नाव अशाप्रकारे खराब होऊ देणार नाही. मुंडे यांच्याविरोधात केेलेली तक्रार मी मागे घेत आहे. त्यांच्याविरोधात कुठलीच तक्रार करणार नाही. तसेच बलात्काराचीही तक्रार नाही. त्याबाबतचे कुठलेच व्हिडीओ, फोटो माझ्याकडे नाहीत. तक्रार मागे घेण्याबाबत कुठलाही दबाव नाही, असे तिने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
* हे तर राजकारणातील पहिले ‘मी टू’ प्रकरण
कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी हे राजकारणातील पहिले ‘मी टू’ प्रकरण असल्याचे सांगितले. यावर वेळीच रोख बसणे गरजेचे असून, अखेर सत्याचाच विजय झाल्याचे मत त्यांनी मांडले.
...................................