लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमधील एका तरुणीने फेसबुकवर प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात पोस्ट टाकल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. या तरुणीने माफी मागावी यासाठी वंचित बहुजन आघाडीने एकीकडे राज्यभरात पोलिसांना निवेदने दिली असतानाच अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
स्नेहल कांबळे असे या तरुणीचे नाव असून ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुंबई प्रदेश सचिव आहे. या तरुणीने दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्यात प्रकाश आंबेडकरांचा आक्षेपार्ह उल्लेख करून टीका केल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना निवेदने दिली. तर दुसरीकडे अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेरही वंचितच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. स्नेहल हिच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तिने प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी खबरदारी म्हणून स्नेहल यांच्या घरी बंदोबस्त ठेवला आहे. मात्र काही वेळाने स्नेहल यांनी फेसबुकवर माफी मागत या विषयावर पडदा टाकला. वंचितने याबाबत पोलिसांना निवेदन दिले असून स्नेहलविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर स्नेहल हिने आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंबेडकर कुटुंबीयातील सदस्यांवर अशा प्रकारे विधान वापरणे हे चुकीचे असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
- डॉ. जानू मानकर, निरीक्षक, वंचित बहुजन आघाडी