Join us

तरुणांनो उमेदवार निवडताना नैतिकताही पहा; बदल शक्य - सत्यजित तांबे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 9:16 PM

मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालापादरम्यान पत्रकारांशी संवाद

श्रीकांत जाधव , मुंबईपक्ष निष्ठा,नैतिकता अंगी नसलेल्या नेत्यांमुळे राजकारणापासून तरुण पिढी दूर जात आहे. मात्र अशावेळी पळ काढण्यापेक्षा काहीतरी करण्याची वेळ आहे. तरुणांनी निवडणुकीत आपले उमेदवार निवडताना नैतिकता असलेल्या नेत्याला निवडून दिले, तर त्याचा मोठा परिणाम होऊन बदल शक्य आहे, असा विश्वास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग मूळ आराखड्यानुसार नसल्याने त्याचा उद्देश सफल होत नाही. म्हणून माझा त्याला विरोध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी वार्तालाप कार्यक्रमात आमदार सत्यजीत तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, राही भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

सिन्नर मध्ये औदयोगिक प्रगती झाली तर येथील १० ते १२ जिल्ह्यांचे भले होणार आहे. आजही गावाकडे रोजगार नसल्याने पुण्या मुंबईकडे धाव घेणारे तरुण अधिक आहेत. तेव्हा त्यांना तेथेच रोजगार, नोकऱ्याची संधी उपलब्ध झाली पाहिजे. भारताची लोकसंख्या हे बलस्थान आहे. गुणवत्ता आणि कौशल्यामुळे भारतीय इतर देशात स्थायिक झाले. तेथील राजकारणात सुद्धा ते पुढे आहेत. मात्र काही आमदार सभागृहात केवळ मतदारसंघाचे प्रश्न मांडतात. सभागृह राज्याचे व्यापक प्रश्न मांडले गेले पाहिजेत. मी ते मांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. 

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गात सिन्नर, संगमनेर, पुणे मार्गात सह्याद्री पर्वतरांगांमधील बोगदे आणि पूल बांधायला जास्त खर्च येणार आहे. त्यामुळे मूळ आराखड्यात बदल करून तो शिर्डीमागे वळवण्यात आला आहे. शिर्डीमार्गे रेल्वे गेल्यास प्रकल्पाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून हा मार्ग मूळ आराखड्यानुसारच नेण्यासाठी लढा देण्याची विनंती केली आहे. २०१७-१८ मध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर हा मार्ग सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरूनगरमार्गे पुण्याला नेण्याचा आराखडा मंजूर झाला. मात्र, आयत्या वेळी हा मार्ग शिर्डीवरून नेण्याचा घाट राज्य सरकारने घातला. त्यामुळे आमचा त्याला ठाम विरोध असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या सभागृहात हा प्रश्न सुटला नाही, तर आंदोलन उभारून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :सत्यजित तांबेमुंबई