ध्वनी प्रदूषण राेखण्यासाठी कार्यरत तज्ज्ञांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उन्हाळ्यात कमाल तापमानाचा पारा वाढल्याने घामाघूम व्हायला होते. बहुतांश घरात एसी बसविले जातात किंवा यापूर्वी बसवलेले पण पावसाळा आणि हिवाळ्यात बंद करून ठेवलेले एसी पुन्हा सुरू केले जातात. मात्र ते सुरू करताना त्याची देखभाल-दुरुस्ती केली जात नाही. परिणामी असे जुनाट एसी आवाज करू लागल्याने शेजाऱ्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पोलिसांकडे तक्रार केली तर निश्चित कारवाई केली जाते, अशी माहिती ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत तज्ज्ञांकडून देण्यात आली.
आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, एसी नवीन असतो तेव्हा तो आवाज करत नाही, मात्र जुना झाला की त्याचा आवाज येऊ लागताे. या आवाजाचा त्रास शेजारी राहत असलेल्या लोकांना होतो. मात्र याचा काेणी विचारच करत नाही. मुळात एसी खूप आवाज करत असेल तर त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. एसीच्या आवाजाचा त्रास हाेणाऱ्यालाच हा आवाजामुळे हाेणारे ध्वनी प्रदूषण किती किती त्रासदायक आहे, याची जाणीव असते.
* येथे करता येते तक्रार
एसीच्या ध्वनी प्रदूषणाची नोंद ८० डेसिबलही नोंदविण्यात येते. ताे जास्त जुना असेल तर अधिकच ध्वनी प्रदूषण करतो. आपल्या आजूबाजूला एसीचा आवाज होत असेल तर त्याची तक्रार आपल्याला पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करता येते. सर्वसामान्य माणसाकडे ध्वनी प्रदूषणाची नोंद घेणारे यंत्र नसते. मात्र पोलिसांकडे किंवा संबधित यंत्रणेकडे यासाठीच्या कारवाईसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असते. तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाते, असे सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले.
---------------------