तुमचे नगरसेवक अकार्यक्षम!

By admin | Published: August 18, 2015 03:22 AM2015-08-18T03:22:46+5:302015-08-18T03:22:46+5:30

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा मांडणारा ‘प्रजा फाउंडेशन’चा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या अहवालात नगरसेवकांच्या

Your Corporators are inefficient! | तुमचे नगरसेवक अकार्यक्षम!

तुमचे नगरसेवक अकार्यक्षम!

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा मांडणारा ‘प्रजा फाउंडेशन’चा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या अहवालात नगरसेवकांच्या मूल्यमापनानुसार भारतीय जनता पार्टी महापालिकेत एक नंबरचा पक्ष ठरला आहे. शिवसेना यंदा थेट चौथ्या स्थानी घसरली आहे. समितीच्या सभांमधील नगरसेवकांची उपस्थिती खालावली आहे. सभांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्याही रोडावली आहे. मात्र प्रश्नांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावल्याचे यंदाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी ‘प्रजा’च्या परीक्षेत कार्यपद्धतीच्या मूल्यमापनानुसार नगरसेवक ‘नापास’च झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रजाच्या अहवालानुसार, महापालिकेतील मोठ्या पक्षांचा विचार केला तर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीच्या मूल्यमापनानुसार भारतीय जनता पार्टी पहिल्या स्थानी राहिली आहे. भाजपाला सर्वाधिक ६१.०३ टक्के मार्क मिळाले आहेत. त्याखालोखाल समाजवादी पक्षाला ५९.६० टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९.५६ टक्के, शिवसेनेला ५९.१७ टक्के, काँग्रेसला ५८.४१ टक्के आणि मनसेला ५४.३४ टक्के मिळाले आहेत. २०१३-१४ साली ही सरासरी ५९.४१ टक्के एवढी होती, तर २०१४-१५ साली ती ५८.०९ टक्क्यांवर अर्थात एक टक्का खाली आली आहे.
२०१४-१५ मध्ये ९ नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. शिवाय समितीच्या सभांमधील नगरसेवकांची हजेरी रोडावल्याचे समोर आले आहे. हजेरी ८१ टक्क्यांवरून ६८ टक्क्यांवर आली आहे. २०१२ साली निवडून आल्यापासून ३० नगरसेवकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या गुन्हे दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या वाढून ५७ झाली आहे.
२०१४-१५ मध्ये विविध समितीच्या सभांमधील गैरहजेरी अतिशय ठळकपणे दिसून येत आहे. २०१२-१३ मध्ये समितीच्या सभांची हजेरी ८१ टक्के होती. ती कमी होऊन ६८ टक्क्यांवर आली आहे. त्यातही २०१४-१५ मध्ये ८१७ सभांमध्ये २ हजार ७२७ प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजेच प्रति बैठकीतील ही सरासरी ३.३ इतकी कमी आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या संख्येशी जर नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची तुलना केली, तर येणारे गुण केवळ २९ टक्के एवढेच आहेत.
३१ डिसेंबर २०१४ पर्यंत नगरसेवकांविरुद्ध नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४० नगरसेवकांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेत झालेली वाढ समाधान देणारी आहे. २०१२-१३ मध्ये ही टक्केवारी ४७ टक्के होती. २०१४-१५ मध्ये ही टक्केवारी ५१ एवढी झाली. महत्त्वाचे म्हणजे माहिती, जागरूकता व लोकप्रतिनिधींची पोहोच यामध्येही वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये ही टक्केवारी ३५ टक्के होती. २०१४-१५ मध्ये ही टक्केवारी ५२ एवढी झाली आहे.

मूल्यमापनानुसार, भाजपाच्या नगरसेविका सुनीता यादव यांनी सर्वाधिक म्हणजे ८०.८७ टक्के गुण मिळवून प्रथम स्थान पटकावले आहे. तर काँग्रेसचे नोशिर
मेहता आणि अजंता यादव यांना अनुक्रमे ७६.९८ टक्के, ७६.५७ टक्के गुण मिळाले आहेत. ते दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत.

टॉप टेन नगरसेवक
सुनीता यादव, भाजपा
नोशिर मेहता, काँग्रेस
अजंता यादव, काँग्रेस
हेमांगी वरळीकर, शिवसेना
ज्ञानमूर्ती शर्मा, भाजपा
संजय मुणगेकर, शिवसेना
संजय पवार, शिवसेना
हेमांगी चेंबूरकर, शिवसेना
मनोज जामसुतकर, काँग्रेस
श्रद्धा जाधव, शिवसेना

‘मौनी’ नगरसेवक (एकही प्रश्न उपस्थित न करणारे)
मनीषा पाटील, शिवसेना
चंगेझ मुलतानी, अपक्ष
केसरबेन पटेल, काँग्रेस
सुखदा पवार, मनसे
मोहम्मद तन्वीर मोहम्मद अली पटेल, काँग्रेस
अविनाश सावंत, मनसे
प्रतीक्षा घुगे, राष्ट्रवादी
मंगल कदम, मनसे
मंजू कुमरे, शिवसेना

निधी वापरातील टॉप टेन नगरसेवक
प्राजक्ता विश्वासराव, शिवसेना
ललिता अन्नामलाई, अपक्ष
वकील सागीर अहमद शेख, काँग्रेस
श्रद्धा पाटील, मनसे
वीरेंद्र तांडेल, मनसे
सुधीर जाधव, मनसे
योगेश भोईर, काँग्रेस
राजेंद्र सूर्यवंशी, शिवसेना
सबरेड्डी बोरा, आरपीआय (ए)
जितेंद्र वळवी, शिवसेना

Web Title: Your Corporators are inefficient!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.