Join us

तुमची ईडी... तर आमचे मुंबई पोलीस, राज्यात पॉलिटीकल 'वॉर'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 7:22 AM

ईडीने पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलीयन विरोधात कारवाईत ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त केली

मनीषा म्हात्रेतुमची ईडी तर आमचे मुंबई पोलीस हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वाक्य सध्याच्या घडीला खरे ठरताना दिसत आहे.  एकीकडे ईडीने अनिल देशमुख आणि नवाब  मलिक यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर धडक कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे आता राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई पोलीसदेखील ॲक्शन मोडमध्ये आहेत. 

ईडीने पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलीयन विरोधात कारवाईत ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त केली. दाखल असलेल्या गुन्ह्यात ईडीकडून हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीचा शोध सुरू आहे. चतुर्वेदीने हमसफर डिलर प्रा. लि. कंपनी या बनावट कंपनीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे विनातारण कर्ज श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीत वळते केले होते. चतुर्वेदीशी संगनमत करून हा पैसा महेश पटेल याने पळविला आणि पुढे तो श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या बांधकाम प्रकल्पात गुंतविण्यात आला. त्यामुळेच ईडीने पाटणकर यांच्या निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका जप्त केल्या. त्यापाठोपाठ ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तर, प्राप्तीकर विभागाने शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणात मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे सेनेला मोठा झटका बसला आहे.

केंद्रीय यंत्रणेकडून कारवाई सुरू असताना दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन व्यावसायिक जितेंद्र नवलानी नावाची व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला होता. यापूर्वी शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली. यादरम्यान ७० कंपन्यांची यादीही दिली. मात्र,  या तक्रारीला वर्ष उलटून गेल्यावर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जितेंद्र नवलानी संबंधित ५ कंपन्यांसह  संशयास्पद व्यवहार केलेल्या  कंपन्यांना नोटीस बजावली आणि चौकशी सुरू केली. मात्र, नवलानी भारताबाहेर पळून गेल्याच्या शक्यतेमुळे त्याच्या चौकशीचे मोठे प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर आहे.

साधारणपणे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होते. राज्यांतील काही अशाच महत्त्वाच्या गुन्ह्यांचा पुढील तपास केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याकडे घेतात आणि राज्यातील तपास यंत्रणेला फक्त बघत बसावे  लागते. याचाच प्रत्यय नुकताच परमबीर सिंह यांच्या विरोधातील गुन्हे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे गेल्यातून आला आहे.  मात्र, सध्या तपास यंत्रणाच एकमेकांच्या मागावर लागल्याचे दिसते. यात आता आर्थिक गुन्हे शाखा आपल्याकडील तक्रारींवरून गुन्ह्यांमध्ये ईडीचेच कनेक्शन शोधत आहे. त्यामुळे सध्या तपासाचा खेळखंडोबा झाल्याचे दिसते.

दरम्यान, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याशी संबंधित चौकशीचा वेग वाढला आहे. बोगस मजूर प्रकरणातही प्रवीण दरेकर यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्यावरही अटकेची करवाई करण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांच्या या चढाओढीतून काय समोर येते ते पाहायचे.

टॅग्स :मुंबईअंमलबजावणी संचालनालयगुन्हेगारीपोलिस