तुमचे कुटुंब सुखरूप राहावे, म्हणून माझा बाबा रस्त्यावर उतरून लढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:05 AM2021-04-26T04:05:07+5:302021-04-26T04:05:07+5:30
पोलिसांच्या मुलांनी व्यक्त केल्या भावना; पोलीस वसाहतीमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘तुम्ही, तुमचे कुटुंब सुखरूप ...
पोलिसांच्या मुलांनी व्यक्त केल्या भावना; पोलीस वसाहतीमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तुम्ही, तुमचे कुटुंब सुखरूप राहावे म्हणून माझी आई, माझा बाबा जीव धोक्यात घालून लढत आहेत. तुम्ही त्यांना घरी राहून सहकार्य करा. जेणेकरून हे युद्ध लवकर संपेल आणि आमचे आईबाबाही घरी सुखरूप येतील,’ अशा भावना पोलिसांच्या मुलांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका मुंबई पोलिसांनाही बसताना दिसत आहे. तरीही न थकता, न घाबरता ते ऑन ड्यूटी २४ तास लढत आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे मुंबईतील आठ हजांराहून अधिक पाेलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित झाले. यावर्षी ५४१ जणांना काेराेना झाला; तर कोरोनामुळे आतापर्यंत १०५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
वरळी, नायगाव आणि मरोळ या मोठ्या पोलीस वसाहती असून मुंबईत एकूण ४६ पोलीस वसाहती आहेत. यांत हजारो पोलीस कुटुंबीय वास्तव्यास आहेत. कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशांची अंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, त्यात कस्तुरबा रुग्णलयातील सुरक्षा व्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांची, नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधीपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण, लसीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या व्यक्तीची माहिती घेणे, तसेच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून ते स्वतःला कुटुंबापासून दूर ठेवत आहेत. अन्लॉकच्या काळात पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा जैसे थे परिस्थिती झाल्यामुळे घरातून निघालेले पाेलीस बाबा किंवा आई घरी सुखरूप परतेल की नाही, अशी भीती मुलांना आहे. पाेलीस वसाहती सतत या दहशतीखाली जगत आहेत.
* ५५ वर्षांवरील कर्मचारी, अधिकारी पोलीस ठाण्यात
गेल्या वेळेस ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबविण्यात आले होते. मात्र सध्या अशा पोलिसांना पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. फील्डवर्कसाठी जास्तीत जास्त तरुण पोलिसांवर जबाबदारी देण्यात येत आहे.
* ७० टक्के पोलिसांचे लसीकरण
मुंबईत आतापर्यंत ७० टक्के पोलिसांचे लसीकरण झाले आहे;तर ४० टक्के पोलिसांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
प्रतिक्रया
* मी झोपल्यानंतर बाबा येतो...
बाबाची भेट होत नाही. तो माझ्यासोबत खेळतही नाही. मी त्याची वाट बघून झोपून जाते. अशात मी झोपल्यावर तो येतो आणि मी झोपेतून उठेपर्यंत तो कामावर गेलेला असतो.
- सान्वी शिवशंकर भोसले
* बाबाचा अभिमान वाटतो
माझ्या बाबाचा मला अभिमान वाटतो. सध्या त्याच्यामुळे आम्हाला काही होऊ नये म्हणून आम्हाला गावी पाठवले आहे. दोन महिने झाले बाबाची भेट नाही; पण माझ्यासारखी अन्य मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तो लढतोय. तुम्हीही घरी राहून त्याला मदत करा. म्हणजे माझा बाबा लवकर मला भेटायला येईल.
- स्तुती मोरे
* तुम्ही घरात राहून लढा
कोरोनाच्या काळात माझ्या बाबासारखे अनेक जण जीव धोक्यात घालून कार्यरत आहेत. गेले कित्येक महिने आम्ही नीट बोललो, भेटलो नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याला घरात राहून सहकार्य करणे गरजेचे आहे; कारण आम्हीही आमच्या बाबाची घरी वाट पाहतोय.
- भक्ती केशव माडकर
................................................