मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमच्या विरोधात असले, तरी तेमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविषयी आदरानेच बोलायला हवे. मात्र शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान, राज्यपाल यांचे उल्लेख कशा पद्धतीने केले जातात? ‘तुमची इज्जत चांगली आणि त्यांच्या चिंध्या’ हे कसे चालेल?, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला.
पुरवणी मागण्यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले मुद्दे मांडले. ते म्हणाले, प्रसार माध्यमे जर विरोधात बोलत असतील, मुख्यमंत्र्यांचे उल्लेख चुकीच्या पद्धतीने करत असतील, तर त्याचे समर्थन कदापि केले जाणार नाही. मात्र छगन भुजबळ ज्या पोटतिडकीने उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी बोलले त्याच पोटतिडकीने त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उल्लेख कसे केले जातात हे देखील तपासून पहावे.
वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गळे काढणारे आज गप्प आहेत? कोणाचाही एकेरी उल्लेख चुकीचा आहे. मात्र हाच निकष सर्व माध्यमांना लागू असला पाहिजे असे सांगून फडणवीस म्हणाले, कंगना रनौतच्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो, त्यामुळे महाराष्ट्रातल्या पोलिसांचा नक्कीच अपमान झाला आहे. पण या सभागृहाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचे हे उत्तम उदाहरण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.इगोसाठी निर्णय नको
आरेच्या कारशेडवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कारशेड पहाडी गोरेगावला नेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रीन ट्रिब्यूनल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी आरे येथील कारशेड योग्य आहे, असे सांगितले होते. मेट्रोचे काम बंद ठेवल्याने रोज साडेचार कोटींचे नुकसान होत आहे. विकास कामांचे निर्णय घेताना स्वत:च्या इगोसाठी घेऊ नयेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडतो. स्वत:च्या इगोसाठी जनतेचा पैसा का वाया घालवता?, असेही फडणवीस म्हणाले.
विदर्भ-मराठवाड्यात माणसं नाहीत का?
कोरोनाची साथ राज्यात पसरली असताना मुंबई-पुण्याकडे सगळ््यांचे लक्ष आहे. नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी एकही आढावा बैठक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ही शहरे महाराष्ट्राबाहेर आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. विदर्भ, मराठवाड्यात माणसे नाहीत का? विदर्भात अतिवृष्टी झाली तरी तिकडे कोणी फिरकले नाही, असा सवालही फडणवीस यांनी केला.