मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांना शुक्रवारी चक्क धमकी दिली. पण, ही कौटुंबिक स्वरूपाची लडिवाळ धमकी होती. कबड्डी पुरस्कारांच्या सोहळ्यात पवार यांनी मंत्री केदार यांच्या नातेसंबंधांचा खुलासा केला. बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे क्रीडाप्रेमी आणि मार्गदर्शक होते. केदार हे त्यांचे नातजावई. त्यामुळे खेळातील सुविधांबाबत त्यांना हक्काने सांगू शकतो. त्यांनी ते काम केले नाही तर तुझे घर आमच्या हातात, अशी धमकी देऊ शकतो, असा मिस्किल इशाराच पवार यांनी दिला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात शरद पवार यांच्या हस्ते ‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पवारांसह खा. सुनील तटकरे, खा. गजानन कीर्तीकर, सुनील केदार, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ कबड्डीपटू शुभांगी दाते - जोगळेकर आणि वसंत रामचंद्र ढवण यांना कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. पवार म्हणाले की, क्रिकेटप्रमाणे भारतीय खेळांना सुविधा मिळायला हव्यात. मी मुख्यमंत्री असताना पुण्यात बालेवाडी सुरू झाले. या क्रीडा संकुलात २५० खेळांची सोय आहे. केदार यांनी तिथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तयार करण्यासाठी प्रक्रिया पार पाडली. असे विद्यापीठ करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्याचे सारे श्रेय केदार यांना आहे.
‘कबड्डी की हुतुतु’ चा संघर्ष कबड्डी आणि कबड्डी संघटना हे आपले एक कुटुंब आहे. एकेकाळी कबड्डी की हुतुतु असा संघर्ष झाला. देशपातळीवर खेळ न्यायचा असेल तर हुतुतुचा आग्रह महाराष्ट्राने सोडावा, अशी भूमिका बुवा साळवी यांनी घेतली. बुवा साळवी यांनी आयुष्यात कबड्डी सोडून दुसरे काही केले नाही. त्यांचे योगदान आपण विसरू शकत नाही, असेही पवार म्हणाले. याप्रसंगी सुनील केदार, सुनील तटकरे आणि भाई जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.