तुमचा पतंग-मांजा लाईट तर घालवणार नाही ना...
By सचिन लुंगसे | Published: January 12, 2024 06:38 PM2024-01-12T18:38:19+5:302024-01-12T18:39:53+5:30
मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो.
मुंबई: पतंग उडवताना पतंग, पतंगाचा मांजा विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, विद्युत वाहिन्यांच्या या वीज वितरण यंत्रणांच्या संपर्कात आल्याने अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडवताना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. वीजवाहिन्या, खांबावर अडकलेली पतंग वा मांजा काढण्याचा प्रयत्न टाळावा. कारण विद्युत वाहिन्यांच्या परस्पर घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानीची शक्यता असते. घराच्या गच्चीवरून, ट्रान्सफॉर्मरवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न टाळावा, असे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.
मांजा वापरण्यावर कायदेशीर बंदी असून या मांजावर धातुमिश्रितरसायनाचे कोटिंग केलेले असल्यामुळे त्यातून वीज प्रवाह संचार करू शकतो. असा मांजा विद्युत तारेला अडकताच विद्युत यंत्रणेमध्ये विघाड होऊन संबंधित भागातील वीज पुरवठा खंडित होऊ शकतो व त्याचबरोबर अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, त्यामुळे कुठलाच मांजा वापरु नये. मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. वीजतारा व वाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वादळ वारा व पावसामध्ये वीज पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते.
तार किंवा मांजा विजेची वाहक असते. यामुळे जर हा मांजा वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी त्याद्वारे उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते. दुर्घटना लक्षात आली किंवा कळली तर १९१२२ या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे. - अदानी इलेक्ट्रिसिटी
वीजवाहिन्यांत अडकलेले पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून वाहिन्यांवर फेकू नये. धातुमिश्रीत मांजाचा वापर टाळावा. कारण धातुमिश्रीत मांजा विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यात वीज प्रवाहीत होऊन विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो. - महावितरण. महावितरण ग्राहक सुविधा केंद्राच्या १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
टाटा पॉवरने घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
-निवडक भागांत स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेत सुरक्षतेसाठी प्रचार करण्यात आला.
-पोलिसांच्या मदतीने मांजा विकला जाणाऱ्या जागांचा शोध घेतला आणि अशा वस्तू विकू नयेत याबाबत दुकानदारांना सांगितले.
येथे पथनाट्ये, पोस्टर यांच्या माध्यमातून जनजागृती
धारावी - धोबी घाट ते सायन
वडाळा - गणेश नगर आणि पंचशील नगर
मानखुर्द
कुर्ला - ठक्करबापा कॉलनी
चेंबूर - शेल कॉलनी
वडाळा - रफी अहमद किडवाई रोड
अँटॉप हिल
कांदिवली पूर्व - बिहारी टेकडी
कांदिवली पश्चिम - लालजी पाडा
बोरिवली - ठाकूर कॉम्प्लेक्स,
मालाड पश्चिम - मालवणी
पवई - मोराराजी नगर
भांडुप पश्चिम - टेंभी पाडा
भांडुप गाव
मरोळ
विक्रोळी - टागोर नगर