Shiv Sena Dasara Melava : पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांवर निशाणा साधला. दसऱ्यानिमित्त आयोजित मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या मेळाळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही भाजपची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत", असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला.
याचबरोबर, कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचं की हे थडगं बघा कसं सजवलं. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? नवाज शरीफांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
बाप चोरणारी औलाद, शिंदे यांच्यावर टीकाउद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक सोबत होते. अमित शाह बोलले की असं काही ठरलंच नव्हतं. पण मी शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचं असं ठरलं होतं. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही. शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. याला आमदार केलं, मंत्री केलं, आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा यांची गद्दारी सुरुच. ही बाप चोरणारी औलाद आहे."
"फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, दीड दिवसासाठी आले आणि..." उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत. त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोण म्हणतोय चुन चुन के मारूंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय कुत्री पाळायची का?
'एकही माणूस भाड्याने आणला नाही'ते पुढे म्हणाले, 'मला तुमच्या प्रेमाचे संरक्षण मिळाले आहे. आपल्या पक्षात गद्दारांनी गद्दारी केली, हा गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. अनेकांना प्रश्न पडला की, शिवसेनेचे काय होणार. माझ्या मनात चिंता नव्हती. ज्यांनी हे कार्य सोपवले आहे, तो बघून घेईल. आज शिवतीर्थ पाहून त्यांना वाटतंय गद्दारांचे आता काय होणार. इथे एकही माणूस भाड्याने आणला नाही. कोणालाही विचारा, एकही माणूस विकत आणला नाही. इथे आलेले सर्व एकनिष्ठ आहेत. हीच ठाकरे कुटुंबाची खरी कमाई आहे.'