तुमचा जीव धोक्यात; उबर, ओलाने जात असाल तर आधी हे वाचा
By मनोज गडनीस | Updated: December 17, 2024 12:25 IST2024-12-17T12:24:16+5:302024-12-17T12:25:06+5:30
मुंबईत अशा घटना रोज घडतात; तुम्हाला असा अनुभव आला तर पोलिसांना सांगा

तुमचा जीव धोक्यात; उबर, ओलाने जात असाल तर आधी हे वाचा
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :उबर टॅक्सीने जात असताना संबंधित गाडीचा ड्रायव्हर गाडी चालवताना सातत्याने फोनवर बोलत होता. त्यावेळी त्या गाडीतील प्रवाशाने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर संबंधित ड्रायव्हरने प्रवाशाशी हुज्जत घातली. प्रवाशाने पोलिसांत जाण्याची सूचना केल्यावर पोलिस माझे काय वाकडे करतील, मी पोलिसांवरच कारवाई करेन, इतकी अरेरावी या ड्रायव्हरने केली. ही घटना रविवारी सायंकाळी मुंबईत घडली.
संबंधित प्रवाशाने 'लोकमत'शी संपर्क साधत या घटनेची संपूर्ण माहिती दिली. या घटनेनंतर 'ओला' किंवा 'उबर' असेल, हे ड्रायव्हर गाडी चालवताना सातत्याने फोनवर बोलून प्रवाशांचा जीव धोक्यात का घालतात, असा प्रश्न उभा राहिला आहे.
हा वाद जिथे सुरू होता तेथून जवळच वाहतूक पोलिस होते. या प्रवाशाने पोलिसांना बोलावले. त्यानंतर या ड्रायव्हरने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तुमचा काय संबंध, मला दंड केला तर मी तुमच्या विरोधात तक्रार करेन. त्यानंतर पोलिसाने प्रवाशाकडे विचारणा केली असता चालक गाडी चालवताना फोन उचलल्याचे सांगितले. मग पोलिसांनी नियमावर बोट ठेवत त्याच्यावर दोन हजार रुपयांच्या दंडाची आकारणी केली. यानंतर संतप्त ड्रायव्हरने प्रवाशाला तुला बघून घेऊन, कोर्टात खेचेन अशी भाषा सुरू केली.
एका प्रवाशाने रविवारी सायन येथून अंधेरीसाठी उबर टॅक्सी बुक केली. एमएच -०१ ईएम - ९८२७ या गाडीत बसल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत या ड्रायव्हरला कुणाचा तरी फोन आला आणि पुढील सात- आठ मिनिटे तो फोनवर बोलत होता. सुरुवातीला या प्रवाशाने त्याकडे दुर्लक्ष केले.
बीकेसी कनेक्टरवर गाडी पोहोचल्यानंतर त्या ड्रायव्हरला आणखी एक फोन आला आणि त्याने पुन्हा बोलणे सुरू केले. त्याने गाडी बाजूला घेत समोरच्या व्यक्तीला ओटीपीची माहिती द्यायला सुरुवात केली. दहा मिनिटे गाडी बाजूला उभी होती. तेव्हा प्रवाशाने त्यावर आक्षेप घेतला.
त्यानंतर ड्रायव्हरच्या अरेरावीला सुरुवात झाली. ही गाडी कंपनीची आहे. तुम्ही विकत घेतलेली नाही. मी फोनवर बोलेन नाहीतर काहीही करेन. तुमचा काय संबंध. तुम्ही फोनवर बोलत नाही का, अशी बडबड त्याने सुरू केली.
'लोकमत'चे काही प्रश्न
- गाडी चालवताना मोबाइलवर बोलू नये, असा नियम असताना हे ड्रायव्हर फोनवर का बोलतात?
- अशा चालकांना पोलिसांचा धाक नाही का?
- गाडी चालवताना मोबाइलच्या हेड फोनवरून बोलणे कायद्याला धरून आहे का?
- संबंधित ड्रायव्हर कुणाशी काय बोलत असेल किंवा बोलताना त्याचे कुणाशी भांडण झाले आणि त्याची मानसिक स्थिती बिघडली आणि त्या परिस्थितीत त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले तर याला जवाबदार कोण?
- अशा परिस्थितीत अपघात झाला तर प्रवाशाला उबर-ओला कंपनी काय भरपाई देणार?
- गाड्यांच्या विमा पॉलिसीत प्रवाशाला संरक्षण कवच असते का?
प्रवाशाला भुर्दंड
ड्रायव्हर चालकासोबतच्या वादानंतर प्रवाशाने विलंब होत असल्यामुळे पोलिसांच्या समक्ष त्या ड्रायव्हरला ट्रीप रद्द करण्याची सूचना केली. मात्र, मी ट्रीप रद्द करणार नाही. तुम्हाला वाटले तर तुम्हीच रद्द करा, असा पवित्रा घेतला. प्रवाशाला विलंब होत असल्यामुळे अखेरीस प्रवाशानेच ती ट्रीप रद्द केली. मात्र, यात भुर्दंड प्रवाशालाच बसला. हा प्रकार प्रवाशाने उबरला कळवला, मात्र सोमवार संध्याकाळपर्यंत प्रतिसाद मिळला नाही.
प्रवाशांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. अशा प्रकरणांची दखल घेऊन आम्ही चौकशी करून योग्य ती कारवाई करतो. गाडी चालवताना फोनवर बोलणे, पोलिसांशी हुज्जत घालणे हे आमच्या धोरणाला अनुसरून नाही. - प्रवक्ता, उबर.