Join us

तुमचा मेकअप बनावट नाही ना? बनावट सौदर्यप्रसाधनांचा सव्वा कोटींचा साठा जप्त; व्यापाऱ्याला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:14 PM

आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : ब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांच्या नावाखाली बनावट सौंदर्यप्रसाधने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासह कारखाना मालकाला आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक कोटी चाळीस लाखांची बनावट सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली आहे. पालघर आणि वसई येथील कारखान्यात हे प्रोडक्ट बनवून ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसर, तसेच गुजरात, नवी दिल्ली आदी राज्यांमध्ये विक्री करत होते. 

आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. रेतीबंदर परिसरात एकजण नामांकित ब्रँडची बनावट सौंदर्यप्रसाधने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखा २ चे पोलिस उपायुक्त मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील व सी. बी. कंट्रोलच्या पोलिस पथकाने माहीम रेतीबंदर येथे सापळा रचून बनावट सौंदर्यप्रसाधनांचा साठा डिलिव्हरी करण्याकरिता आलेल्या टेम्पोची झडती घेतली.  टेम्पोमधून नामांकित कंपन्यांचा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात कॉपिराइट ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला.

तीन पथकांनी घातला छापा

गुन्ह्यात साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीत, अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याने सदरची बनावट सौंदर्यप्रसाधने पालघर येथील त्याच्या स्वतःच्या गुदामवजा कारखान्यात व वसई येथील सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कारखान्यातून तयार केल्याची माहिती मिळाली. पुढे, ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसर, तसेच गुजरात, नवी दिल्ली आदी राज्यांमध्ये विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार, तीन वेगवेगळी पथके तयार करून नालासोपारा येथील गुदाम व दोन सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून विविध नामवंत कंपन्यांची उत्पादने तसेच ती बनविण्यासाठी वापरण्यात येणारी मशिनरी व कच्चा माल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने कारखाना मालकालाही अटक केली आहे. दोघांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

टॅग्स :गुन्हेगारी