मुंबई/नाशिक - शिवसेना शिंदे गट आणि भाजपात सारंकाही आलबेल आहे, असं दोन्ही गटांकडून जाणीवपूर्वक दाखवण्यात येतं. शिवसेना आणि भाजपचे दोन्ही नेते एकमेकांचा आदरही करतात, मान-सन्मान देऊन कार्यक्रमांची आखणी आणि नियोजन होत असतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत भाजप नेते, कार्यकर्त्यांमध्ये प्रकर्षणाने जाणवते. यापूर्वी स्वत: चंद्रकांत पाटील यांनीही ही खंत बोलून दाखवली होती. मात्र, नाशिकमधील एका कार्यक्रमात घडलेल्या प्रकारावरुन आता भाजप-शिंदे गटात काहीशी ठिणगी पडल्याचं दिसून येतंय. भाजपच्या महिला आमदार सीमा हिरे यांचा अवमान झाल्यावरुन भाजप प्रवक्त्याने संताप व्यक्त केला आहे.
नाशिकच्या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री दादा भुसे यांच्या समेवत भाजप आमदार सीमा हिरे याही उपस्थित होत्या. मात्र, यावेळी रिबीन कापताना एका व्यक्तीचा सीमा हिरेंना धक्का लागला आणि त्या खाली पडल्या. मात्र, महिला आमदार खाली पडल्यानंतरही दोन्ही मंत्री महोदयांनी साधी दखलही घेतली नसल्याचा आरोप करत भाजप समर्थकाने संताप व्यक्त केला आहे. तसेच, या संतापातून शिंदे गटाच्या नेत्यांना सुनावलं आहे. अजित चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राग व्यक्त करत, तुमची मंत्रीपदं भाजपामुळेच आहेत, असे म्हणत भाजप-शिंदे गटातील नाराजी एकप्रकारे उघड केलीय. तर, घडला प्रसंगही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन मांडला आहे.
नेमका काय घडला प्रसंग
सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक किती उथळ झाले आहेत याचा अतिशय धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला भारतीय जनता पक्षाच्या आमदार ज्या सीमाताई हिरे यांना एका अतिशय अपमानस्पद प्रकाराला सामोरे जावे लागले सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ज्यांचा वावर अतिशय सौजन्यशील असतो. नाशिकच्या लोकप्रतिनिधींमध्ये सीमाताई या अतिशय सुसंस्कृत राजकारणी म्हणून सर्वसामान्यांना आपल्या वाटतात. अशा व्यक्तीचा झालेला अपमान नाशिककरांच्या जिव्हारी लागला आहे.औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धनंजय बेळे या कायम मिरवून घेण्यासाठी पुढे-पुढे करणाऱ्या व्यक्तीने सीमाताईंना मागून धक्का दिला आणि त्या पडल्या हे स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. अनावधानाने असं होऊ शकतं, कुणाचाही कुणालाही धक्का लागू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे...पण आपल्यामुळे कुणीतरी पडलं त्याची माफी मागणं हे सौजन्य आहे ते साधं सौजन्यही न दाखवता उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सरसवून फोटो काढून मिरवून घेण्यात हे धनंजय बेळे पुन्हा एकदा व्यस्त झाले... या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री उदय सामंत,मंत्री दादा भुसे या दोघांनीही आपल्या एका लोकप्रतिनिधी भगिनीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असताना तातडीने तो कार्यक्रम थांबवून आधी दखल घेऊन. त्यांची विचारपूस करायला हवी होती. मात्र असं न करता ताई तिथून निघून गेल्या तरीदेखील त्याची दखल न घेता उद्घाटन सोहळा पार पाडणाऱ्या मंडळींचा मी जाहीर निषेध करतो सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना लोक आपल्याला पाहत असतात नाशिककरांनी तर धनंजय बेळे या स्वयंघोषित उत्सव मूर्तीवर बहिष्कार घालायला हवा इतकी संस्कारहीन संवेदनाहीन वागणूक नाशिककरांना या व्यक्तीची दिसली आमदार सीमाताई हिरे या आमदार आहेत म्हणून नाही तर या ठिकाणी कुणीही माणूस असता तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसा बरोबर देखील असं जर झालं तर ते अतिशय वाईट झाल असत. मात्र समस्त नाशिककरांच्या आदरास पात्र असलेल्या लाखो मतांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा अपमान होतो. आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्री बघत बसत असतील तर व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील घसरणारा हा स्तर पाहून वाईट वाटत आहेच, पण पक्षाचा सह मुख्यप्रवक्ता म्हणून या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेऊन मी याचा निषेध व्यक्त करतो. राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यापर्यंत ही नाराजी पोचवली जाईल आणि त्यांनाही झालेल्या प्रकार आवडेल असं मला वाटत नाही राहिला प्रश्न धनंजय बेळे या व्यक्तीचा या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या या या संस्कारहीन आणि मिरवून घेण्याची हौस असणाऱ्या माणसावर नाशिककरांनी बहिष्कार घालण्याची गरज आहे.
अजित चव्हाणभाजप