- सचिन लुंगसे मुंबई : ई-कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटची विल्हेवाट कशी लावायची याचे दाखले दिले जात असतानाच आता देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ई-कचऱ्यात मोबाइल फोन, चार्जर, लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशीनचा समावेश आहे. या माेहिमेंतर्गत ६९२ भागांतून ११८ फेऱ्यांद्वारे ई-कचरा गोळा करण्यात आला. मुंबई, ठाणे व जवळपासच्या विविध भागात १०० इको-बिनची व्यवस्था करण्यात आली. ई-कचरा निर्मितीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर असून देशात वर्षाला ३.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका ई-कचरा निर्माण होतो. त्यापैकी सुमारे ३० टक्के पश्चिम भारतात तयार होतो. सुरू करण्यात आलेल्या या माेहिमेंतर्गत लोकांच्या घरून ई- कचरा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सामग्री निर्माण करणाऱ्या निर्मात्यांना ई-कचरा व्यवस्थापन नियम पाळण्याच्या दृष्टीने व्यासपीठ प्राप्त झाले आहे.विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना ही उपकरणे टाकून द्यायची असतील तर त्यांचा हा ई-कचरा गोळा करण्याचे आणि त्याचे रिसायकलिंग करण्याचे काम या मोहिमेद्वारे केले जात आहे. आर्थिक लाभ मिळण्यापेक्षा पर्यावरणाला अधिक महत्त्व देणाऱ्यांकडून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे सांगण्यात आले. माती, हवा, जल पर्यायानेे मानवी आरोग्यावर परिणाम२०२५ पर्यंत देशाचा ई-कचऱ्याचा आकडा ८ दशलक्ष मेट्रिक टनवर जाण्याचा अंदाज आहे. देशातील युवा तसेच कमावत्या लोकसंख्येकडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी आहे, परंतु त्याचवेळी, या ई कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. पर्यावरण व्यवस्थेचा ऱ्हास येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावा लागेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पद्धतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात. त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील माती, हवा, जल आणि पर्यायानेे मानवी आरोग्यावर होतो.- बी. के. सोनी, तज्ज्ञ, ई-कचरा रिसायकलिंग क्षेत्र
तुमचा मोबाइल, चार्जर, लॅपटॉप वाढत्या ई-कचऱ्याला जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:54 AM