आपली मुंबईची मुलगी विरुद्ध चौकीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 01:06 AM2019-04-08T01:06:51+5:302019-04-08T01:07:33+5:30
सोशल मीडियावरही प्रचार : मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर आणि भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या लढाई सुरू झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी अद्याप तरी झडत नसल्या, तरी सोशल मीडियावर मात्र दोन्ही उमेदवारांनी आपली ओळख हॅशटॅगद्वारे दाखवत मतदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील गल्ल्या पालथ्या घालण्यास सुरुवात केली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शेट्टी यांनी शोभायात्रांमध्ये सहभाग घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षरीत्या शेट्टी यांचा मतदारांना भेटण्यावर जोर असतानाच, त्यांची सोशल मीडियाची टीमही मैदानात उतरली आहे. गोपाळ शेट्टी यांनी टिष्ट्वटरवर स्वत:चा उल्लेख ‘चौकीदार’ म्हणून केला आहे. ‘कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून खूप आनंद झाला...’ अशा प्रकाराच्या पोस्ट करून ‘चौकीदार’ आपल्या भावना व्यक्त करत आहे. या व्यतिरिक्त निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनापासून सभा आणि प्रचार फेरी; यांची माहिती अपलोड करण्यासाठी शेट्टी यांची सोशल मीडियाची टीम कार्यरत आहे.
काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी अद्याप आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसला, तरीदेखील त्यांनी आपल्या प्रचारातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यावर जोर दिला आहे. प्रचारादरम्यान रिक्षा चालविण्यापासून चप्पल खरेदी करणाऱ्या उर्मिला यांची सोशल मीडिया टीमही वेगाने कार्यरत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, उर्मिला यांनी ‘आपली मुंबईची मुलगी’ असा स्वत:चा उल्लेख करत, हॅशटॅगद्वारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. गुढीपाडव्यात लेझीम खेळून आणि ‘आपली मुंबईची मुलगी’ असा हॅशटॅग चालवून छायाचित्रांद्वारे मतदारांना आकर्षित करत असलेल्या उर्मिला या ‘हा लढा आहे तरुण मावळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी...’ असे म्हणत तरुणांनी आपल्याकडे ओढू पाहात आहेत.
एकंदर फिल्डवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले हे दोन्ही उमेदवार सोशल मीडियावरही अपलोडिंगमध्ये आघाडीवर असले, तरी प्रत्यक्षात ही तर सुरुवात आहे. परिणामी, जसजशी मतदानाची तारीख जवळ येईल, तसतसे दोघांमधील चुरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रंगणार आहे.