Join us

बापरे! तुमच्या नावावरही असू शकतो वाहतूक नियम मोडल्याचा दंड; रक्कम पाहून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 9:49 AM

अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे.

मुंबई - 1 सप्टेंबरपासून देशात नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालविणारे आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर वेळीच सावध राहा अन्यथा तुम्हाला वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. 

सध्या वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीस ई-चलनने कारवाई करत असल्याचं दिसत आहे. नकळत अथवा गडबडीत तुम्ही वाहतुकीचे नियम मोडून सर्रासपणे गाडी चालवित असाल तर तुमच्या नावावर ई-चलन दिले जाते. अनेकदा वाहतूक पोलीस नसल्याचं पाहत वाहनचालक बिनधास्तपणे वाहतूक नियम मोडतात. मात्र सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांची ही कारवाई सुरूच असते. त्यामुळे तुमच्या नावावर ई-चलन तयार होते.

अनेकांना माहितीही नसेल की, त्यांच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे. त्यामुळे आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईल इंटरनेटवरून मिळवू शकता. डिजिटल इंडियामुळे अनेक सरकारी कामे ऑनलाइन होत आहे. त्यामुळे आरटीओबाबतच्या समस्या आणि तक्रारीचं निवारण करण्यासाठी आरटीओची अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये echallan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या वाहनावर किती दंड जमा आहे हे तपासू शकता. वाहन नोंदणीवेळी तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर याचे मॅसेज येत असतात. मात्र अनेकजण नंबर बदलल्यामुळे हे मॅसेज तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. या वेबसाईटवर जाऊन काही जणांनी आपली नावं तपासली असता अनेकांना दंडाची रक्कम पाहून धक्का बसला. 

नवा मोटार वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सीट बेल्टचे नियम न पाळणे आदींसाठी पूर्वीच्या तुलनेत दहापट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे.  

जर तुम्ही विना परवाना गाडी चालवित असाल तर 5 हजार रुपये दंड भरावा लागेल. त्याचसोबत दारुच्या नशेत गाडी चालविली तर 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हे नियम मोडल्यामुळे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला जेलची हवा खावी लागणार आहे.  जर अल्पवयीन मुलाने गाडी चालवून अपघात केल्यास, त्याच्या पालकांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तसेच त्या वाहनाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. 

टॅग्स :वाहतूक पोलीस