'तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत', मनचिसेचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:50 PM2019-10-23T16:50:00+5:302019-10-23T16:50:48+5:30
प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
मुंबई - मराठी चित्रपटांना सुगीचं दिवस आले आहेत, असे आपण बऱ्याचदा बोलतो किंवा ऐकतो. मराठी सिनेसृष्टीत विविध विषय हाताळताना पहायला मिळतात. तसेच मराठीतील प्रेक्षकराजादेखील तितकाच जागृत झाला आहे. मात्र, अनेकदा मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये शोज मिळणं कठीण होतं. मराठी चित्रपट 'हिरकणी' आणि ट्रीपल सीट हे दोन चित्रपट 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहेत. मात्र, या चित्रपटांनाही सिनेमा हॉल मिळणे कठीण बनले आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 4' हा 26 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. 'हाऊसफुल 4' मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नसल्याने मनसेने पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा दिला आहे. हिरकणी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला होता. त्यानंतर आता, मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपट मालकांना स्मरणपत्र लिहून प्रश्न विचारला आहे.
'हिरकणी' व 'ट्रिपल सीट' ह्या मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात हक्काच्या वेळा, स्थान मिळणार नसेल तर...
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) October 23, 2019
"आपण आपले चित्रपटगृह महाराष्ट्राच्या भूमीत चालवता ह्याचा आपल्याला विसर पडला असावा..." मनसे उपाध्यक्ष @MNSAmeyaKhopkar ह्यांचं चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र.#मनसेदणकाpic.twitter.com/E6bIFBHkAr
आपण आपले चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत चालवता याचा आपल्याला विसर पडला असावा म्हणून हे स्मरणपत्र लिहित असल्याचे मनचिसेनं म्हटलं आहे. महाराष्ट्राचाी अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी जे हवे ते आम्ही करू, असे म्हणत मनचिसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी चित्रपटगृह मालकांना स्मरणपत्र देऊन इशाराच दिला आहे. तसेच, 24 ऑक्टोबर रोजी हिरकणी आणि ट्रीपल सीट या मराठी चित्रपटांना सिनेमा हॉल उपलब्ध करुन देण्यासही मनचिसेनं चित्रपटगृह मालकांना बजावले आहे.