बाप्पा चालले आपुल्या गावा!

By admin | Published: September 15, 2016 02:45 AM2016-09-15T02:45:58+5:302016-09-15T11:42:38+5:30

बाप्पाच्या घरी परतण्याचा काळ जसा जवळ आला आहे, तसे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे

Your village is your village! | बाप्पा चालले आपुल्या गावा!

बाप्पा चालले आपुल्या गावा!

Next

मुंबई : विघ्न हरून आनंद देणारी बुद्धीची देवता म्हणजे ‘गणपती बाप्पा’, गेले दहा दिवस मुक्कामी आहेत. त्यांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमयी झाले आहे, पण बाप्पाच्या घरी परतण्याचा काळ जसा जवळ आला आहे, तसे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे.
श्रीगणेश चतुर्थीपासून बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागत झाले. बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको, म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईकर तयारीला लागले. अगदी घरगुती बाप्पाच्या सजावटीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीपर्यंत सगळीकडे भाविकांंची लगबग सुरू होती. दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर, अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी आनंदाने निरोप देण्याची तयारी सगळीकडे सुरू आहे. विघ्नाचे हरण करणाऱ्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडली जावी, यासाठी खबरदारीही भाविक घेत आहेत. विशेष म्हणजे, यंदा पारंपरिक पद्धतीने बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्याचे अनेकांनी ठरविले असल्यामुळे, लेझीम, टाळ यांचा सरावही सुरू झाला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असे म्हणत मुंबईकर बाप्पाच्या विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत.
ढोल पथक सज्ज
बाप्पाच्या स्वागतापासून ते बाप्पाच्या विसर्जन यात्रेमध्ये आतापर्यंत ढोलपथकांचे वर्चस्व दिसून आले आहे. डी.जे.च्या तालावर धिंगाणा घालण्यापेक्षा, यंदा अनेक मंडळांनी ढोल पथकांच्या गजरात बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार म्हटल्यावर, मुंबई आणि उपनगरातील ढोल पथके सज्ज झाली आहेत. (प्रतिनिधी)


मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरून जाऊ नये
माशांचा दंश झाल्याचे जाणवल्यास तत्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी. अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावावा. माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे. जेणेकरून जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही. मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरून जाऊ नये. महापालिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामूल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करून घ्यावी.

मत्स्यदंशापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीने समुद्रातील पाण्यात किंवा किनाऱ्यावरील चिखलात उघड्या अंगाने अथवा अनवाणी जाऊ नये.भाविकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी. लहान मुलांना पाण्यात आणि विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा. गणेशभक्तांनी मूर्तीचे विसर्जन करताना पायात गमबूट घालावेत.
महापालिकेतर्फे उपलब्ध विनामूल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा. मद्यप्राशन करून समुद्रकिनारी जाऊ नये. कारण अशा व्यक्तींवर मत्स्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.


वाहतूक पोलिसांतर्फे गणेश विसर्जन स्थळांचे ठिकाणी बंद पडलेली किंवा वाळूत रुतलेली वाहने बाजूला काढण्यासाठी क्रेन्सची व्यवस्था. वाळूत वाहने रुतू नयेत म्हणून पालिकेतर्फे स्टिल प्लेट्स लावण्यात आलेल्या आहेत. ठिकठिकाणी प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिन्यांची सोय. -वाहतूक व मिरवणूका वेगवेगळ्या करण्यासाठी विविध रस्त्यांवर ड्रम्स आणि दोरखंड वापरले जातील.

३,५०० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील चौपाट्यांवर होणाऱ्या गणेश विसर्जनानिमित्ताने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबई शहर व उपनगरातील वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल ३ हजार ३६ पोलिसांचा फौजफाटा तैनात राहील, अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, सशस्त्र दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवान, स्वयंसेवकांसह विद्यार्थीही वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी जागोजागी तैनात असतील.
मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे आणि पवई येथे उभारण्यात आलेल्या पाच नियंत्रण कक्षांद्वारे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्याद्वारे मिरवणुकांचे नियंत्रण करण्यात येणार आहे. ३,५३६ वाहतूक पोलिसांच्या मदतीला सशस्त्र पोलीस दलाचे
१०० जवान, गृहरक्षक दलाचे २५० जवान, विविध स्वयंसेवी संस्थांचे सहा हजार स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनांचे ९०० विद्यार्थी, नागरी संरक्षण दलाचे १,५०० स्वयंसेवक, स्काउट अँड गाइडचे ३०० विद्यार्थी, ३९० वाहतूक रक्षक, रस्ता सुरक्षा दलाचे १०० शिक्षक, राष्ट्रीय छात्र सेनेचे ४०० विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५०० स्वयंसेवक, हॅम रेडिओचे ३५ स्वयंसेवक आणि काही महाविद्यालयीन विद्यार्थी असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Your village is your village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.