लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी दिल्याने शुक्रवारी एकच खळबळ उडाली. यानंतर पवार यांच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
मास्टरमाइंड शोधा
धमकीमागचा खरा मास्टरमाइंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे, हेच राज्याच्या हिताचे असेल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले.
कुठे आणि कशी दिली धमकी?
- ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. हे अकाउट मात्र लॉक आहे. अमरावतीचा राहणारा सौरभ पिंपळकर हा या फेसबुक पेजचा मॉडरेटर (ॲडमिन) आहे.
- आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख पिंपळकर याने आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये केलेला आहे. ‘मी भाजपचा कार्यकर्ता आहे, मी धर्मनिरपेक्षतेचा द्वेष करतो’ असे त्याने लिहिलेले आहे.
गृहमंत्री फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश
पवार यांना आलेल्या धमकीची शहानिशा करून कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
खा. संजय राऊत यांनाही धमकी, दोन जण ताब्यात
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील यांनादेखील फोनवरून जिवे मारण्याची धमकी आली. राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी अथवा भावासह जिवे मारण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून ते गोवंडीतील आहेत.
कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करता येईल, असे वाटत असेल, तर त्यांचा हा गैरसमज आहे. कार्यकर्त्यांनी शांतता आणि सौहार्द राखावे. - शरद पवार