अंबरनाथ कॉल सेंटरमधील तरुणांचीही फसवणूक

By admin | Published: June 11, 2017 02:31 AM2017-06-11T02:31:31+5:302017-06-11T02:31:31+5:30

अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. मात्र, या कामासाठी ज्या कॉल सेंटरमध्ये तरुणांची भरती

The youth of Ambernath call center also cheated | अंबरनाथ कॉल सेंटरमधील तरुणांचीही फसवणूक

अंबरनाथ कॉल सेंटरमधील तरुणांचीही फसवणूक

Next

- पंकज पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. मात्र, या कामासाठी ज्या कॉल सेंटरमध्ये तरुणांची भरती करण्यात आली होती, त्यांचीही अप्रत्यक्ष फसवणूक झाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांना हे कॉल सेंटर बोगस असल्याचे किंवा आपण अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करत आहोत, याची किंचितही कल्पना नव्हती. त्यामुळे हे कॉल सेंटर चालवणाऱ्यांना अटक करण्याची मागणी होत आहे.
अंबरनाथमधील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या कॉल सेंटरवर ठाण्याच्या गुन्हे शाखेने कारवाई केल्यावर या ठिकाणी सुरू असलेले बोगस कॉल सेंटरचे रॅकेट उघड झाले. या ठिकाणी काम करणारे तरुण हे अमेरिकन नागरिकांना बँकेतून कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करत होते, हे समोर आले आहे. मात्र, प्रत्यक्षात या तरुणांसोबत चर्चा केल्यावर त्यांनाही त्यांच्या कामाची पूर्ण माहिती नव्हती. अमेरिकन कोलंबस बँकेच्या कर्ज विभागाचे काम भारतीय कंपनीला मिळाले असून, त्या बँकेचे काम करण्यासाठी भारतात कॉल सेंटर सुरू केल्याचे या तरुणांना सांगून त्यांना या ठिकाणी नोकरी दिली जात
होती.
अमेरिकेतील बँकेचे काम मिळत असल्याने या तरुणांनीही आनंदाने या ठिकाणी नोकरी केली. खरोखरच, कर्जासाठी ग्राहकांना कॉल करावे लागत असल्याने या तरुणांना कधी किंचितही संशय आला नाही. त्यातच, ग्राहकांकडून प्रोसेसिंगची रक्कम स्वीकारली जात असल्याने प्रत्येक बँकेत असे व्यवहार होतात, याची कल्पना असल्याने त्या प्रोसेसिंगचा आणि फसवणुकीचा काही संबंध असेल, असे त्यांना वाटलेही नव्हते. त्यातच, कामाची वेळ ही रात्रीची असल्याने दिवसभर या मुलांना कॉलेज करून नोकरी करणे शक्य होत होते. कॉल सेंटरवर धाड पडल्यावर नेमका प्रकार त्यांच्या लक्षात आला.
दुसरीकडे हे कॉल सेंटर माजी नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या पत्नीच्या नावे असले, तरी ते आठ महिन्यांपूर्वी देवेश येरलेकर याला भाडेतत्त्वावर दिल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात रीतसर करारही करण्यात आला आहे. मात्र, कराराची प्रत ज्या व्यक्तीकडे आहे, ती व्यक्ती देशाबाहेर असल्याने ती भारतात परतल्यावर याची प्रत पोलिसांना देण्यात येणार असल्याचे समजते.
तरुणांचा भरणा अधिक
तरुणांना १२ ते २० हजार पगार देण्यात येत होता. सोबत, त्यांना इन्सेन्टिव्ह मिळत असे. त्यामुळे पगार २० ते ३० हजारांवर जात होता. या कॉल सेंटरमध्ये २० ते ३० वयोगटांतील तरुणांचा भरणा अधिक आहे. इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेल्या तरुणांना अमेरिकन उच्चाराचे महिनाभर प्रशिक्षण दिल्यावर त्यांना कामावर घेतले जात होते.

 

Web Title: The youth of Ambernath call center also cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.