लोकलसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 06:03 AM2018-06-25T06:03:22+5:302018-06-25T06:03:25+5:30
लोकलसमोर उडी घेत आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. मालाडपाठोपाठ शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रेनसमोर उडी घेत तरुणाने आत्महत्या केली.
मुंबई : लोकलसमोर उडी घेत आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच आहे. मालाडपाठोपाठ शुक्रवारी कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रेनसमोर उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. याचे सीसीटीव्ही फुटेज रविवारी व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नसून, या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.
शुक्रवारी दुपारी २ वाजून १३ मिनिटाने ही घटना घडली. कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून जाणाऱ्या भरधाव ट्रेनसमोर उडी घेत तरुणाने आत्महत्या केली. सुरुवातीला तो पुढे जाण्यास घाबरत होता. मात्र, गाडी जवळ येताच त्याने उडी घेतली. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. पवार यंनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यापूर्वीच्या घटना
१२ जून - मालाड लोकलसमोर उडी घेत ३६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. १२ जून रोजी सकाळी ८ वाजून २८ मिनिटांनी ही घटना घडली होती.
२१ जून २०१६ - विक्रोळीत फलाट ३ समोरील लोकल समोर उडी घेत ४० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.