अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यासाठी युवक काँग्रेसचे राज्यपालांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:46 PM2020-07-30T17:46:30+5:302020-07-30T17:46:45+5:30
ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीची परीक्षा अथवा ओपन बुक परीक्षा देण्याचा पर्याय गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अन्यायकारी असल्याचे बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी बोलून दाखवत आहेत.
मुंबई- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज मुंबई राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यासाठी साकडे घातले व इतर महत्त्वाच्या मागण्या केल्या. ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीची परीक्षा अथवा ओपन बुक परीक्षा देण्याचा पर्याय गरीब व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत अन्यायकारी असल्याचे बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी बोलून दाखवत आहेत.
पुस्तके बघून परीक्षा देण्याचा पर्याय देखील फार व्यवहार्य नाही, कारण बहुतांश विद्यार्थ्यांकडे संदर्भग्रंथ, पाठ्यपुस्तके अथवा नोट्स नाहीत. या सर्व परिस्थितीचा सारासार विचार करत बहुतांश राज्यांनी परीक्षा प्रक्रिया राबवण्यास असमर्थता दर्शवली असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने आपला निर्णय जबरजस्ती लादणे म्हणजे घटनेने आखून दिलेल्या संघराज्यीय चौकटीचा अवमान करण्यासारखे आहे, असे मत सत्यजीत तांबे यांनी यावेळी मांडले.
मागील चार महिन्यांपासून विद्यापीठ आयोगाने परीक्षांबाबत काहीही स्पष्टता दिली नाही. त्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गाच्या हितार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने खालील मागण्या केल्या आहेत.
1) अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात.
2) मागील सत्रातील मिळवलेल्या सरासरी गुणांच्या आधारे अंतिम सत्राचे गुणांकन करावे.हे करताना देशभरातील सर्व विद्यापीठांनी युजीसीने ठरवून दिलेली समान प्रक्रिया राबवावी जेणेकरून पुढचा गोंधळ होणार नाही.
3)बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा विद्यार्थ्यांकडून घेतली असल्याने ती फी विद्यार्थ्यांना परत केली जावी. महाविद्यालये परत कधी खुलणार याबाबत अनिश्चिती असल्याने नवीन सत्राची फी घेऊ नये.लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणी वाढल्याने पुढील सत्राची फी भरण्यापासून दिलासा द्यावा.
4) निकालाची जी प्रत आहे त्यावर कोणताही शेरा मारला जाऊ नये. अन्यथा हा निकाल विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मनोबल खच्ची करणारा असतो.
5) एटीकेटी व बॅकलॉग च्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात यावे.
6) जे विद्यार्थी कोरोना महामारीच्या काळात विद्यापीठाच्या वा कॉलेजच्या सूचनेनुसार कामं करत आहेत,या विद्यार्थ्यांना कमवा व शिका या योजने अंतर्गत मानधन देण्यात यावे.
7) विद्यापिठातील पीएचडी/डॉक्टरेट चे संशोधक अथवा विद्यार्थ्यांचे कोरोना काळात रखडलेले मानधन (फेलोशिप) लवकरात लवकर देण्यात यावे.
या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देत युवक काँग्रेस हि शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत उभी राहील अशी ग्वाही यावेळी तांबे यांनी दिली.
यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, भारतीय युवक काँग्रेसच्या सहसचिव रिषिका राका, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस करीना झेविअर आणि विश्वजित हप्पे यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासोबत गेले होते.