तरुणाने इमारतीच्या टेरेसवर निर्माण केली ‘फळबाग’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:55 AM2018-12-27T04:55:03+5:302018-12-27T04:56:18+5:30

कांदिवली पश्चिमेकडील गौरव गार्डन कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये एका तरुणाने टेरेसवर फळबाग निर्माण केली आहे. फळबागेमध्ये विविध फळझाडे लावण्यात आली

 Youth created 'Horticulture' on the terrace of the building | तरुणाने इमारतीच्या टेरेसवर निर्माण केली ‘फळबाग’

तरुणाने इमारतीच्या टेरेसवर निर्माण केली ‘फळबाग’

Next

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील गौरव गार्डन कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये एका तरुणाने टेरेसवर फळबाग निर्माण केली आहे. फळबागेमध्ये विविध फळझाडे लावण्यात आली असून, आता वेगवेगळ्या प्रजातींची फुलपाखरेसुद्धा फळबागेकडे फिरकू लागली आहेत. इमारतीच्या टेरेसवरील ८०० चौरस फुटांमध्ये फळबाग तयार करण्यात आली आहे.
१८ महिन्यांच्या प्रयत्नाने विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड केल्याने वेगवेगळ्या प्रजातींची फुलपाखरे फळबागेकडे आकर्षित होऊ लागली आहेत. गृहनिर्माण सोसायटीच्या टेरेसवर फळबाग तयार करणारे पर्यावरणप्रेमी अंकित व्यास हे आहेत. ते म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात इतक्या नाजूक प्रजातीच्या फुलपाखरांचे पालन, संगोपन करणे आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी तसे वातावरण निर्माण करणे हे खूपच सोपे काम आहे. दीड वर्षांपूर्वी फळांची बाग तयार करायला सुरुवात केली. यात सफरचंद, नासपती, चेरी, स्टार फ्रुट, द्राक्षे, हापूस, काजू, कोकम इत्यादी फळझाडे बागेमध्ये लावली आहेत. पेरूचे चार ते पाच प्रकारांची झाडे आणि सीताफळ व आंब्याच्या दहा प्रजातीची फळझाडे बागेमध्ये लावण्यात आली आहेत, असेही अंकित व्यास यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
लाइम बटरफ्लाय, क्रिमसॉन रोज, कॉमन क्रो, ग्रीन जे, ब्लू बॉटल, ब्लू जे, कॉमन ग्रास येलो, आॅरेंज टीप इत्यादी रंगीबेरंगी फुलपाखरे फळबागेत वावरत असतात. शहरातील विकास प्रकल्पांमुळे झाडांची कत्तल होतेय. परिणामी, झाडांची संख्या कमी होऊन वातावरणातील हवा दूषित होत आहे. मात्र, आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत झाडे लावली तर त्याचा फायदा माणसाला नक्कीच होणार आहे. झाडे हवेतील प्रदूषण कमी करून, शुद्ध हवा वातावरणात सोडण्याचे काम करते, असेही व्यास यांनी सांगितले.

Web Title:  Youth created 'Horticulture' on the terrace of the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई