अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात शनिवारी महाराष्ट्र दिनी १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लसीकरणाला सुरुवात करण्याचा मुहूर्त राज्य शासनाने साधला आहे. दिवसभरात २६ जिल्ह्यांत ठरावीक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. लसीकरणासाठी तरुणाई सरसावल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पाहायला मिळाले.
राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाले असून, लाभार्थ्यांची संख्या १ हजार ३०६ इतकी आहे. त्याखालोखाल मुंबईत १,००४, पालघर ७००, परभणीत ८०४, तर ठाण्यात ६११ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वांत कमी लसीकरणाची नोंद गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यात झाले असून, येथील लाभार्थ्यांची संख्या अनुक्रमे ८३, ९० आहे.
पहिला डोस खासगीमध्ये, दुसरा सरकारी हॉस्पिटलमध्ये
मुंबई : राज्यात ८०८ खासगी लसीकरण केंद्रे सुरू होती, ती बंद झाल्याने १८ ते ४४ आणि ४५ ते पुढील वयोगटांतील लोकांचा सर्व भार आता सरकारी यंत्रणेवर येणार आहे. ज्या लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस खासगी हॉस्पिटलमध्ये घेतला, त्यांना दुसऱ्या डोससाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार आहे.१ मेपासून खासगी हॉस्पिटलनी लस स्वतः विकत घ्यावी, असे सांगितले आहे. ज्या ठिकाणी पहिला डोस घेतला, तिथेच दुसरा घेतला पाहिजे, असे बंधन नाही. पहिली लस घेताना जी कागदपत्रे दिली, तीच दुसरा डोस घेताना दाखविली, तर तुम्ही कुठेही दुसरा डोस घेऊ शकता, असे यावर सरकारचे स्पष्टीकरण आहे.
...तर नव्याने नोंदणीn कोविन ॲप आणि प्रत्यक्षात मिळणारी लस यात मोठी तफावत आहे. ॲपवर जाऊन तुम्ही तुमचे नाव नोंदणी करू शकता. मात्र, नोंदणी केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या लसीकरण केंद्रावर लस असेलच, याची खात्री कोणीही द्यायला तयार नाही. तेथे लस नसेल, तर तुम्हाला पुन्हा नव्याने नाव नोंदणी करावी लागेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. n महाराष्ट्रात तिसरी लाट आली आणि त्यापासून रुग्णांचा बचाव करायचा असेल, तर कोणत्याही परिस्थितीत जुलै अखेरपर्यंत मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, अन्यथा आपण तिसऱ्या लाटेमध्ये विचित्र अडकून जाऊ, अशी भीती अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
‘लस परत करा!’ n केंद्राच्या निर्देशानुसार, शनिवारपासून खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद होत असल्याने, संबंधितांनी त्यांना जेथून लस मिळाली, तेथे उरलेली लस परत करा, असे आदेश केंद्र सरकारने काढले होते. n महापालिकेच्या रुग्णालयात सकाळपासून लस जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, दुपारी १२ नंतर अचानक तुम्ही जमा केलेली लस परत घेऊन जा आणि आजच लसीकरण संपवा, असे सरकारी पातळीवरून सांगण्यात आले. n खासगी रुग्णालयांनी पुन्हा लसी आणल्या व दुपारनंतर लसीकरण सुरू केले. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांत गर्दी झाली होती.