Join us

आरेच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू; अग्निशमन दल दोन तास उशिरा, नातेवाइकांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:28 PM

मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या २० वर्षीय सचिन सिंगचा शुक्रवारी मृत्यू झाला. तलावात खोलवर चिखल असल्याने स्थानिकांना त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही.

मुंबई : मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या २० वर्षीय सचिन सिंगचा शुक्रवारी मृत्यू झाला. तलावात खोलवर चिखल असल्याने स्थानिकांना त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनाही त्याच्यापर्यंत पोहोचण्यास दोन तास उशीर झाला. वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचला असता, असे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मरोळच्या गावदेवी परिसरात सचिन आईवडील, चार भावंडांसह राहायचा. तो कांदिवलीच्या निर्मलादेवी महाविद्यालयात शिकत होता. याच परिसरातील युनिट क्रमांक २०शेजारी पालिकेने तलाव बांधला आहे. शुक्रवारी सचिन गणेश मंदिरामागील या तलावात तीन मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. काही वेळाने सचिन आणि सूरज सिंग हे दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. बचावासाठी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेत सूरजला वाचविले. मात्र सचिन बुडाला. याबाबत आरे पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना त्याच्यापर्यंत मदत पोहोचविण्यास दोन तास उशीर झाल्याचा आरोप सचिनच्या नातेवाइकांनी केला. शिवाय तलावाभोवती कुठलीच सुरक्षा व्यवस्था नाही. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्याचे नातेवाईक ओमप्रकाश शुक्ला यांनी सांगितले.अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे सचिनच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. त्याचे वडील चालक म्हणून काम करतात.

टॅग्स :मुंबई