सज्ज व्हा, उठा, चला! दहिसरच्या गणपत पाटील नगरमधील युवक देशसेवेसाठी झाले सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:23 PM2021-07-10T17:23:57+5:302021-07-10T17:24:23+5:30
Indian army news: देशाच्या सीमेचे रक्षण करावे असे स्वप्न मनाशी बाळगून आता येथील युवक मोठ्या संख्येने देश सेवेसाठी भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई--बोरिवली प. गणपत पाटील नगर म्हणजे दाटीवाटीने वसलेली आणि मुंबईत धारावी नंतर मोठी अलेलेली ही झोपडपट्टी. मुंबईत याठिकाणी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांची संख्या येथे जास्त आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करावे असे स्वप्न मनाशी बाळगून आता येथील युवक मोठ्या संख्येने देश सेवेसाठी भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे. (The youth of Ganpat Patil Nagar of Dahisar got ready for national service)
शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी सैन्यदलात सामील होणाऱ्या युवकांना विभागात प्रशिक्षण दिले जात आहे. चार महिन्यापूर्वी या ठिकाणी राहणाऱ्या सत्यम यादव या युवकाची सैन्यदलात निवड झाली होती. या प्रेरणेने आता येथील युवक मोठ्या संख्येने सैन्यदलासाठी प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सदर युवकांना शहीद तुकाराम ओंबळे मैदान प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले आहे. तसेच आज या युवकांना टी शर्ट, स्पोर्ट शूज, शॉर्ट व सॉक्स असे किट घोसाळकर यांच्यातर्फे देण्यात आले. यावेळी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर ,मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जितेंन परमार, दर्शित कोरगावकर लालचंद पाल सहित कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान गणपत पाटील नगर म्हणजे वादग्रस्त झोपडपट्टी हा डाग यामुळे पुसला जाणार असून या ठिकाणी राहणारे युवक मोठ्या संख्येने देशसेवेसाठी भारतीय सेनेत सामील होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. या ठिकाणी राहणारे मनिष सिंग यांची इंडियन पॅरा मिलिटरी फोर्समध्ये निवड झाली आहे.तर सुमारे 30 युवक येथे प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान घोसाळकर कुटूंबियांकडून आम्हां युवकांना देश सेवेसाठी प्रेरित केले जात असून त्यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सिद्धेश आढाव या महाराष्ट्र लोकसेवा आयोगात निवड झालेल्या एका युवकाने सांगितले.