दहिसरच्या गणपत पाटीलनगरमधील युवक देशसेवेसाठी झाले सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:06+5:302021-07-11T04:06:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गणपत पाटीलनगर म्हणजे दाटीवाटीने वसलेली आणि मुंबईत धारावीनंतर मोठी असलेली ही झोपडपट्टी. देशाच्या सीमेचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणपत पाटीलनगर म्हणजे दाटीवाटीने वसलेली आणि मुंबईत धारावीनंतर मोठी असलेली ही झोपडपट्टी. देशाच्या सीमेचे रक्षण करावे, असे स्वप्न मनाशी बाळगून आता येथील युवक मोठ्या संख्येने देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात सामील होण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र आहे.
शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ.विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्यदलात सामील होणाऱ्या युवकांना विभागात प्रशिक्षण दिले जात आहे.
चार महिन्यांपूर्वी या ठिकाणी राहणाऱ्या सत्यम यादव या युवकाची सैन्यदलात निवड झाली होती. या प्रेरणेने आता येथील युवक मोठ्या संख्येने सैन्यदलासाठी प्रशिक्षण घेत आहेत. यासाठी शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सदर युवकांना शहीद तुकाराम ओंबळे मैदान प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिले आहे, तसेच आज या युवकांना टीशर्ट, स्पोर्ट शूज, शॉर्ट व सॉक्स असे किट घोसाळकर यांच्यातर्फे देण्यात आले. सुमारे ३० युवक येथे प्रशिक्षण घेत आहेत.
यावेळी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्युडी मेंडोसा, युवासेनेचे जितेन परमार, दर्शित कोरगावकर लालचंद पालसहित कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी राहणारे मनिष सिंग यांची इंडियन पॅरा मिलिटरी फोर्समध्ये निवड झाली आहे.