संरक्षक भिंत ओलांडून मुंबई विमानतळ परिसरात तरुणाची घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 05:48 IST2022-02-20T05:47:55+5:302022-02-20T05:48:29+5:30
सीआयएसएफ जवानांनी आवळल्या मुसक्या

संरक्षक भिंत ओलांडून मुंबई विमानतळ परिसरात तरुणाची घुसखोरी
मुंबई : एका २१ वर्षीय तरुणाने मुंबईविमानतळाची संरक्षक भिंत ओलांडून घुसखोरी केल्याने खळबळ उडाली. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार निदर्शनास येताच सीआयएसएफ जवानांनी त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
मुंबई विमानतळाच्या पाठीमागील बाजूने, जरीमरी परिसरातून या तरुणाने घुसखोरी केली. संरक्षक भिंतीवरून उडी मारून त्याने थेट रनवेच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार गस्तीवर असलेल्या सीआयएसएफ जवानांच्या निदर्शनास येताच त्यांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
संबंधित तरुणाच्या वर्तनावरून त्याने अमली पदार्थांचे सेवन केले असल्याचा संशय आहे. नशेत असल्याने त्याला नीट बोलता येत नव्हते. त्यामुळे त्याची चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते. पुढील तपासासाठी त्याला विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती मुंबई विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्रीकांत किशोर यांनी दिली.
हा तरुण नेमका कोण आहे, त्याने विमानतळ परिसरात घुसखोरी का केली, त्याचा इरादा काय होता, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याच्याकडे शस्त्र वा अन्य वस्तू आढळल्या नाहीत.