मुंबई : आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक ७ या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या मित्राला सोडायला आलेल्या गोरेगाव पूर्व संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने हल्ला केला असून सदर तरुणाला ट्रामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश धुरी यांनी याबाबतची माहिती दिली.
युनिट नं ७ फिल्म सिटी रोड पंजाब ढाबा सुनील मैदान येथे आपल्या मित्राला सोडावयास खालेल्या संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला आहे. चित्र नगरीतील संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. तसेच येथे मोठ्या प्रमाणात बिबट्याचे दर्शन देखिल पहावयास मिळते. हा परिसर गर्द झाडीने व्यापलेला असल्याने तेथील रस्त्यावरून प्रवास करताना अनेक वेळा बिबट्याचे दर्शन होत असते अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
काल रात्री आरे दुग्ध शाळेसमोरील विसावा या ठिकाणी आपल्या घराच्या पडवीत विश्रांती घेत बसलेल्या 60 वर्षीय महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता. तर आता पुन्हा एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सातत्याने बिबट्याचे हल्ले वाढल्याने त्यामुळे वनखात्याने नुसत्या मिटिंग न घेता बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आरेवासीयांनी पुन्हा एकदा केली आहे.
गेल्या पंधरा दिवसात हा पाचवा हल्ला आहे. दि. 26 रोजी आरेतील युनिट नंबर ३ येथे एका ४ वर्षाच्या बालकावर रात्री याच वेळी म्हणजे ८ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्या बालकावर जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्याच दिवशी काही वेळानंतर रात्री पुन्हा तेथून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या युनिट नंबर ३१ येथील एकता नगर या झोपडपट्टीतील एका घराच्या आवारात धुमाकूळ घातला. दुसऱ्याच दिवशी आरेतील युनिट नंबर २२ येथे बिबट्याचे छोटे पिल्लू आढळून आले. त्याला तेथील रहिवाशांनी सुरक्षितपणे वनखात्याच्या हवाली केले, अशी माहिती निलेश धुरी यांनी दिली.