स्विमिंग पूलमध्ये युवकानं मारली उडी; ७२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:55 PM2023-04-25T12:55:25+5:302023-04-25T12:56:04+5:30
७२ वर्षीय विष्णू सामंत पोहण्यासाठी स्विमिंग पूलला गेले होते. त्याठिकाणी २० वर्षीय युवकही पोहचला होता
मुंबई - शहरातील एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाने उंचावरून उडी मारली त्यानंतर तो थेट एका वृद्ध व्यक्तीवर पडला. या घटनेत वृद्ध व्यक्ती जखमी झाला. उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबाने युवकाविरोधात निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुंबईच्या गोरेगाव येथील ओजोन स्विमिंग पूल इथं रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
७२ वर्षीय विष्णू सामंत पोहण्यासाठी स्विमिंग पूलला गेले होते. त्याठिकाणी २० वर्षीय युवकही पोहचला होता. या मुलाने स्विमिंगपूलमध्ये उंचावरून उडी मारली. तो विष्णू सामंत खाली पोहत होते त्यांच्यावर पडला. या दुर्घटनेत विष्णू सामंत गंभीररित्या जखमी झाले. सामंत यांच्या गळ्याला आणि शरीरातील अन्य अवयवांना दुखापत झाली. जखमी अवस्थेत विष्णू सामंत यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मृत विष्णू सांमत यांच्या पत्नीने युवकावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पत्नीनं म्हटलं की, युवकच माझे पती सामंत यांच्या मृत्यूला जबाबदार आहे.
यापूर्वीही अशा घटना घडल्या
स्विमिंग पूलच्या दुर्घटना याआधीही समोर आल्या आहेत. कर्नाटकच्या बंगळुरू इथं भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी स्विमिंग पूलमध्ये बुडल्यामुळे २ मित्रांचा मृत्यू झाला होता. मृतांचे वय १३ वर्ष होते. हे दोघेही शाळेला दांडी मारून स्विमिंग करण्यासाठी गेले होते. निष्काळजीपणामुळे या मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्विमिंग कोचिंग देणाऱ्या ३ लोकांवर गुन्हा दाखल केला. दोघेही मुले सरकारी शाळेत शिकायला होती. दुपारी दोघे घरातून शाळेत जाण्यासाठी निघाले परंतु शाळेत न जाता ते एमएनसी स्पोर्ट्स एकेडमीच्या स्विमिंग पूल इथं पोहचले. जयंत आणि मोहन असं या दोन्ही मुलांचे नाव होते. १०० रुपये देऊन ते पोहायला गेले होते. दोघेही स्विमिंग करत होते. ६ फुटापासून २० फुटापर्यत दोघे पोहत पुढे गेले. त्यानंतर दोघे बुडायला लागले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.