दंड बसू नये म्हणून तरुणाने मारली ३० फुटांवरून उडी
By Admin | Published: June 28, 2017 03:41 AM2017-06-28T03:41:49+5:302017-06-28T03:41:49+5:30
दंड भरावा लागू नये म्हणून १८ वर्षीय तरुणाने ३० फूट उंचीवरून उडी मारल्याची घटना रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मेट्रो स्थानकावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दंड भरावा लागू नये म्हणून १८ वर्षीय तरुणाने ३० फूट उंचीवरून उडी मारल्याची घटना रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर मेट्रो स्थानकावर घडली. एवढ्या उंचीवरून उडी मारूनही सुदैवाने हा तरुण बचावला आहे. राजकुमार असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा ओडिशामधील रहिवासी आहे. सुरक्षारक्षकांनी जेव्हा राजकुमारला पकडले तेव्हा तो नशेत असल्याची बाब समोर आली आहे.
राजकुमारने चौकशीदरम्यान सांगितले की, तो साकीनाका मेट्रो स्थानकाहून घाटकोपर येथे आला. घाटकोपर येथे पोहोचल्यानंतर त्याने टोकनचा वापर केला. मात्र आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट खुले झाले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारने बाहेर येण्यासाठी एएफसी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे सुरक्षारक्षकांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. नंतर तो तिकीट खिडकीच्या परिसरात आला. या वेळी मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. सुरक्षा कर्मचारी राजकुमारला
ग्राहक सेवा विभागाकडे घेऊन जात असताना त्याने तेथून पळ काढला आणि ३० फूट उंचावरून खाली उडी मारली. यानंतर घाटकोपर पोलिसांच्या मदतीने त्याला
रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, तिकीट काढल्यानंतरही गेट का खुले झाले नाही, अशी विचारणा मेट्रो अधिकाऱ्यांकडे केली असता अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राजकुमारने घाटकोपरपर्यंत मेट्रोचे तिकीट काढले होते, मात्र घाटकोपर मेट्रो स्थानकावर आल्यानंतर राजकुमार बराच वेळ स्थानक परिसरात फिरत होता. तिकीट काढल्यानंतर एक तासानंतर टोकन अमान्य होत असल्यामुळे गेट खुले झाले नाही.