तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:38 AM2017-12-04T06:38:25+5:302017-12-04T06:39:00+5:30
अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ओशिवरा, यमुनानगर आणि मिल्लतनगर येथील शाळकरी मुले आणि तरुणाईचे अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे.
मुंबई : अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, ओशिवरा, यमुनानगर आणि मिल्लतनगर येथील शाळकरी मुले आणि तरुणाईचे अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच परिसरात अमली पदार्थ विकणाºयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संबंधित गंभीर बाब स्थानिकांनी प्रशासनाच्या लक्षात आणूनदेखील प्रशासन ठोस पावले उचलत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. आता अमली पदार्थाविरोधात स्थानिकासह लोकप्रतिनिधीही सरसावले आहेत.
अंधेरीतील तरुण मुले अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करताना दिसत आहेत. आठवी इयत्तेत शिकत असलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अमली पदार्थाचे सेवन सुरू आहे. त्यामुळे ही मुले घरातील मौल्यवान वस्तू विकून अमली पदार्थ खरेदी करतात. त्यामुळे परिसरात घरांमधील मौल्यवान वस्तू गायब होत आहेत. तसेच या मुलांनी नवीन ग्राहक आणल्यावर अमली पदार्थावर सूट दिली जाते. स्थानिक आमदारांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थांच्या विरोधात नुकताच मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा थेट पोलीस ठाण्यात नेऊन पोलीस प्रशासनाला जागे करण्यात आले होते. ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अमली पदार्थाविरोधात मोहीम राबवली जाणार आहे. तसेच प्रत्येक विभागात अमली पदार्थाचे दुष्परिणाम दाखवणारे चित्रपट आणि कार्यशाळेचे आयोजन करणार आहोत, अशी माहिती सजग नागरिकांनी दिली.
दरम्यान, अमली पदार्थांच्या विरोधात अंधेरीमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तसेच स्थानिकदेखील अमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवीत आहेत. अमली पदार्थ सेवन करणाºया संबंधिताला कसे ओळखावे, याचे प्रशिक्षण स्थानिकांना दिले जात
आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तसेच नशामुक्ती मंडळाच्या माध्यमातून मुलांचे समुपदेशन करण्याचे काम सुरू आहे. आता अमली पदार्थांच्या विरोधात स्थानिक आणि लोकप्रतिनिधींचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये शहरात अमली पदार्थ येण्याचा काळ असतो. कारण, या महिन्यातील ३१ डिसेंबरसाठी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहराच्या विविध भागांत आणले जातात. संपूर्ण डिसेंबर महिन्यात अमली पदार्थाविरोधात जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सचिव वर्षा विद्या विलास यांनी दिली.