सामाजिक बांधीलकी जपत उभी राहतेय युवा चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:26+5:302021-09-24T04:06:26+5:30

मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाकडून कोविड काळात गरजवंतांना मदतीचा हात : ५० हजार स्वयंसेवक सहभागी सीमा महांगडे मुंबई : ‘माझ्यासाठी ...

The youth movement is standing up for social commitment | सामाजिक बांधीलकी जपत उभी राहतेय युवा चळवळ

सामाजिक बांधीलकी जपत उभी राहतेय युवा चळवळ

Next

मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाकडून कोविड काळात गरजवंतांना मदतीचा हात : ५० हजार स्वयंसेवक सहभागी

सीमा महांगडे

मुंबई : ‘माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) कक्षाने मागील २ वर्षांच्या कोविड-१९ च्या काळात संसर्गातून उद्भवणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची हिंमत दाखवलीच; पण सोबतच इतर नैसर्गिक आपत्तींनाही मिळून लढा दिला.

कोविड काळातील मास्क वाटप, अन्नधान्य पुरवठा, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, संसर्गासंदर्भातील जनजगृती, रक्तदान शिबिरे, याशिवाय तौक्ते चक्रीवादळातील मदत. शिवाय महाड, चिपळूण, सिंधुदुर्ग येथील महापुराच्या वेळीही मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाच्या विद्यार्थ्यांकडून दाखवण्यात आलेली तत्परता कौतुकास्पद होती.

मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाकडून १ मे २०२० ते आजतागायत जवळपास ३२३ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये २२ हजार ४८४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. ही शासनाच्या आरोग्य विभागाला कोविड काळात करण्यात आलेली सर्वांत मोठी आणि आवश्यक मदत एनएसएस कक्षाकडून पार पाडली जात आहे.

याशिवाय टाळेबंदीच्या काळात १७ अशासकीय स्वयंसेवी संस्था मुंबई शहरात २१ विविध ठिकाणी स्वयंपाकगृहे चालवीत होत्या. मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाकडून एक हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. ज्याची जबाबदारी ३० स्वयंसेवक व १ कार्यक्रम अधिकारी पाहत होते. मुंबई विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांच्या एनएसएस एककाने ८७ हजार रुपये किमतीचे धान्य, औषधी, सॅनिटायझर व जीवनावश्य्क वस्तूंचे वाटप आपापल्या दत्तक गावांमध्ये केले. कोविड काळात मुंबई विद्यापीठांतर्गत तब्बल १७ लाखांपेक्षा अधिक फेस मास्कचे वाटप विविध महाविद्यालये एनएसएस स्वयंसेवकांकडून करण्यात आले आहे.

या काळात विविध महाविद्यालयांच्या एनएसएस युनिटस्कडून ३५६ हून अधिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, योग प्रशिक्षण यांचे धडे देण्यात आले. १ संशोधनपत्रिका, १ अंतरराष्ट्रीय कार्यशाळा, स्वयंसेवक नोंदणीसाठी मोबाइल ॲपची निर्मिती, एक वेब पोर्टल यांचेही आयोजन करण्यात आले.

महाड व चिपळूण येथील परिस्थितीवेळी १० दिवसांसाठी ३०० जणांच्या जेवणाची व्यवस्था मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आली होती, तसेच ६३ हजारांहून अधिक किमतीच्या साहित्याचे वाटप व स्वच्छतेसाठी मदत स्वयंसेवकांनी केली. राष्ट्रीय सेवा योजना ही युवा चळवळ असून, समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा तरुण वर्ग राष्ट्रीय सेवा योजनेतून घडत असल्याची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाचे संचालक सुनील पुराणिक यांनी दिली.

--------

सहभागी युनिटस्

युनिटस्चा प्रकार - महाविद्यालये - कार्यक्रम अधिकारी - स्वयंसेवक

शासकीय अनुदानित युनिटस् - २६८-४६९-४२१००

स्वयंनिर्वाह युनिट्स - १०८- १११- ७३४४

एकूण- ३७६- ५८०- ४९४४४

कोट

राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस कक्षाकडून सामाजिक बांधीलकीतून अनेक समाजोपयोगी उपक्रम नेहमीच हाती घेतले आहेत. कोविड-१९ च्या संकटावर मात करण्यासाठीही मिळून पुढाकार घेतला व गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. समाजसेवेचा हा वसा पुढेही असाच अविरत सुरू राहावा

-प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Web Title: The youth movement is standing up for social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.