तरुणाने वाचविले २५ जणांचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 07:22 AM2018-12-29T07:22:09+5:302018-12-29T07:22:26+5:30

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका तरुणाने प्रसंगावधानाने इमारतीतील तब्बल २५ जणांचे प्राण वाचविले.

 Youth saved lives of 25 lives | तरुणाने वाचविले २५ जणांचे जीव

तरुणाने वाचविले २५ जणांचे जीव

Next

- शेखर साळवे
मुंबई : चेंबूरच्या टिळकनगर परिसरात सरगम सोसायटीला लागलेल्या आगीत गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका तरुणाने प्रसंगावधानाने इमारतीतील तब्बल २५ जणांचे प्राण वाचविले. सौरभ लंके (२०) असे या तरुणाचे नाव असून तो वाणिज्य शाखेत द्वितीय वर्षात शिकतो.
गुरुवारी रात्री साडेसातच्या दरम्यान इमारतीला आग लागली असताना सौरभ हा शेजारच्या इमारतीमध्ये ट्युशनला गेला होता. आगीचे वृत्त त्याला त्याच्या वडिलांकडून समजताच त्याने त्वरित इमारतीचे कम्पाउंड गाठले. त्यानंतर त्याने सुरक्षारक्षकला घेऊन इमारतीची लिफ्ट आणि विजेचे मेन स्विच बंद केले. आग नेमकी कुठे लागली आहे हे दिसतच नसल्याने सौरभने समोरील इमारतीचे टेरेस गाठले. इमारतीच्या बी विंगमधील अकराव्या मजल्यावर आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आल्याने सौरभ इमारतीच्या सुरक्षारक्षकासह तीन मित्रांना घेऊन ए विंगच्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावर पोहोचला. तेथे टेरेसवर जाण्यासाठी १५ फूट वर जाण्यासाठी काहीच मार्ग नव्हता.
या तरुणांनी शक्कल लढवत दहीहंडीप्रमाणे उभे राहून सौरभला वर चढवून टेरेसवर पाठवले. टेरेसवर ठेवलेली शिडी खाली ठेवून त्याने इतरांना टेरेसवर येण्याचा मार्ग केला. त्यानुसार त्यांनी शेजारच्या बी विंगमध्ये जाऊन १२ व्या, १३ व्या आणि १४ व्या मजल्यावरील रहिवाशांना खाली न जाण्याचा सल्ला देत टेरेसवर पाठविले. तसेच आग पसरत असतानाही इमारतीमधील १० ज्येष्ठ नागरिकांना पाठीवर बसवून टेरेसवर घेऊन गेला. या प्रकारे या तीन मजल्यांवरील तब्बल २५ जणांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले. मात्र यादरम्यान चौदाव्या मजल्यावर राहत असलेल्या जोशी कुटुंबातील भालचंद्र जोशी आणि सुमन जोशी या आजीआजोबांना वाचविता आले नसल्याची खंत त्याने व्यक्त केली.

इमारतीची अग्निशमन यंत्रणा निकामी

इमारतीला आग लागली तेव्हा इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा निकामी ठरली. विकासकाने बसविलेली अग्निरोधक यंत्रणा काम करीत नव्हती. आग शमविण्यासाठी इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर लावण्यात आलेले अग्निरोधक सिलिंडर निकामी होते. त्याचा इमारतीमधील रहिवाशांनी वापर करण्याचा प्रयत्न केला असता ते बंदावस्थेत होते. तसेच इमारतीच्या आतील भागातून टेरेसवरील पाण्याच्या टाक्यांमधून खाली तळापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लावण्यात आलेली पाइपलाइनही निकामीच होती.
विकासकाने बसविलेली यंत्रणा काम करीत नाही, अशी तक्रार इमारतीतील रहिवाशांनी जानेवारी २०१८ मध्येच मुंबई अग्निशमन दलाकडे केली होती. तक्रार करून वर्ष लोटले तरी ना विकासकावर कारवाई झाली ना टॉवरची अग्निशमन यंत्रणा बदलली गेली, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
 

Web Title:  Youth saved lives of 25 lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.