मुंबई - माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या युवासेनेत सचिव पदावर कार्यरत असणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनानं राजकीय कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ठाण्यात झालेल्या जनआक्रोश मोर्चात दुर्गा भोसले शिंदे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशीच त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दुर्गानं अखेरचा श्वास घेतला आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे. राज्यभरात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीत दुर्गा भोसले शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. दुर्गा भोसले शिंदे यांच्या अचानक एक्झिटने ठाकरे गटाला मोठी हानी पोहचली आहे. दुर्गा यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
ठाण्यात ठाकरे गटाच्या युवा पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती. परंतु या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत असल्याने महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन केले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. त्यात युवासेना सचिव म्हणून दुर्गा भोसले-शिंदे यादेखील सहभागी होत्या. विशेष म्हणजे त्यांच्या फेसबुक प्रोफाईलमधून त्यांनी या मोर्च्याचे लाईव्ह शेअरिंग केले होते. वाचा आदित्य ठाकरे काय म्हणाले?
मोर्चात चालताना दुर्गा भोसले शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तातडीने त्यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारावेळी दुर्गा भोसले शिंदे यांचे दुर्दैवी निधन झाले. दुर्गा यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला. आदित्य ठाकरे म्हणाले की, दुर्गा यांच्या निधनानं मन सुन्न झाले आहे. आमच्यातील एक अत्यंत मेहनती आणि कष्टाळू युवासैनिक आम्ही गमावली. युवासेनेच्या कुटुंबाला झालेले दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दुर्गा भोसले शिंदे यांच्या मृतदेहावर आज संध्याकाळी ६ वाजता बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या जाण्याने युवा पदाधिकाऱ्यांच्या मनाला चटका बसला आहे.