युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे, राज्यपालांचा तरुणाईला मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:59 PM2022-02-22T12:59:18+5:302022-02-22T13:13:08+5:30

शिक्षण संस्था उत्तम शिक्षक व उत्तम पायाभूत सुविधा देऊ शकतील. परंतु बुद्धिमत्ता विकास व परिश्रम विद्यार्थ्यांना स्वतःच करावे लागणार आहे

Youth should be entrepreneurs without looking for jobs, Governor's mantra to youth | युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे, राज्यपालांचा तरुणाईला मंत्र

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे, राज्यपालांचा तरुणाईला मंत्र

Next

मुंबई - सध्याच्या युगात नवसंशोधन, नवसृजन व विकास अतिशय गतीने होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांकडून तसेच विद्यार्थ्यांकडून नवोन्मेष व नवसृजनाची अपेक्षा आहे. शासनातर्फे स्टार्टअप उपक्रमांना मदत केली जात आहे. अशावेळी युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

दादरा नगर हवेली प्रदेशातील सिल्व्हासा येथे मुंबई विद्यापीठाशी संलग्न श्रीमती देवकीबा मोहनसिंहजी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच हवेली इन्स्टिट्यूट ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च या संस्थेचा वार्षिकोत्सव तसेच नव्या इमारतीच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लायन्स क्लब ऑफ सिल्वासा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फतेहसिंह चौहान, दीव आणि दमणचे खासदार लालूभाई पटेल, सिल्वासा नगरपरिषदेचे अध्यक्ष राकेशसिंह चौहान, लायन्स क्लब ऑफ सिल्वासा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष अनंतराव निकम, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि निमंत्रित उपस्थित होते.

शिक्षण संस्था उत्तम शिक्षक व उत्तम पायाभूत सुविधा देऊ शकतील. परंतु बुद्धिमत्ता विकास व परिश्रम विद्यार्थ्यांना स्वतःच करावे लागणार आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगावे व समाजास आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले. निर्माल्यापासून धूप तयार करण्याच्या देवकीबा महाविद्यालयाच्या ‘आमोद’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करताना हा उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या इतर महाविद्यालयात देखील राबविण्याच्या दृष्टीने आपण सूचना करू असे राज्यपालांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष फतेहसिंह चौहान यांनी सिल्व्हासाचा इतिहास तसेच महाविद्यालयांच्या स्थापनेबद्दल माहिती दिली, तर उपाध्यक्ष अनंतराव निकम यांनी महाविद्यालयाच्या विकासाबद्दल माहिती दिली.

राज्यपालांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच ‘आमोद’ उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाच्या ‘प्रतिबिंब’ व ‘विधान’ या नियतकालिकांचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात तारपा वाद्य वाजविणारे आदिवासी कलाकार किशनभाई भोया यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Youth should be entrepreneurs without looking for jobs, Governor's mantra to youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.