युवकांना विधायक कार्यात जोडले पाहिजे - राज्यपाल
By Admin | Published: October 15, 2015 02:14 AM2015-10-15T02:14:33+5:302015-10-15T02:14:33+5:30
युवा लोकसंख्या ही देशाची खरी संपत्ती आहे. मात्र युवकांना विधायक कार्यात जोडले तरच ती देशासाठी ताकद ठरू शकते, असे सांगतानाच गेवाली यांच्या पुस्तकाने युवकांना प्रेरणा मिळेल
मुंबई : युवा लोकसंख्या ही देशाची खरी संपत्ती आहे. मात्र युवकांना विधायक कार्यात जोडले तरच ती देशासाठी ताकद ठरू शकते, असे सांगतानाच गेवाली यांच्या पुस्तकाने युवकांना प्रेरणा मिळेल, अशी आशा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
जगभरातील प्रज्ञावंतांचे भारताविषयी अभिप्रायांचे संकलन असलेले ‘भारताची खरी ओळख काय?’ या सलील गेवाली यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत बुधवारी राजभवन येथे पार पडले.
मूळचे मेघालय येथील असलेले सलील गेवाली यांच्याच ‘ग्रेट माइण्ड्स आॅन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचे ‘भारताची खरी ओळख काय?’ हे मराठी भाषांतर आहे. एखादी गोष्ट परदेशातील प्रज्ञावंत सांगतात तेव्हाच देशातील लोक ती गांभीर्याने घेतात.
आपलीच योगविद्या ही ‘योगा’ बनून आपल्याकडे येते त्या वेळी आपल्याला तिचे महत्त्व पटते या विसंगतीकडे लक्ष वेधून विनोद तावडे यांनी लेखक गेवाली यांनी भारताची महती विविध देशांतील विद्वानांच्या वचनांमधून सांगितल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)