राज्यात होणाऱ्या ८ हजार पोलीस भरतीचा तरुणांनी लाभ घ्यावा - देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:06 AM2020-02-16T03:06:43+5:302020-02-16T03:06:57+5:30
भाजपवर टीका करताना अनिल देशमुख म्हणाले, ‘‘आज राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे
मुंबई : गेल्या सरकारने राज्यात नव्या पोलिसांची भरती केली नव्हती. मात्र महाआघाडी सरकारच्या राज्यात ८ हजार पोलिसांची नवी भरती होणार असून त्याचा फायदा तरुणांनी घ्यावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोगेश्वरीत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा यांनी नुकतेच अनिल देशमुख व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन जोगेश्वरी पश्चिम एस.व्ही. रोड येथील २४ कॅरेट चित्रपटगृहासमोरील मैदानावर केले होते. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते या मंत्र्यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपवर टीका करताना अनिल देशमुख म्हणाले, ‘‘आज राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे काही मुंगेरीलाल राज्यात त्यांचे सरकार येण्याचे स्वप्न बघत आहे. मात्र त्यांचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रफुल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा व राज्यसभेत सीएए, एनआरसी कायद्याविरोधात भूमिका घेतली. महाराष्ट्रात या कायद्यांना जोरदार विरोध झाला. महाराष्ट्रात २२०० तर मुंबईत १४५ आंदोलने शांततेत झाली. केंद्र सरकारच्या या कायद्यांमुळे महाराष्ट्रातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. २९ जानेवारी रोजी भारत बंद असताना वर्सोवा विधानसभेतील मानवी साखळी करून शांततेत सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करणाºया २०० निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, या नरेंद्र वर्मा यांनी केलेल्या मागणीला आपण न्याय देऊ.’’
प्रफुल पटेल म्हणाले, ‘‘सीएए, एनआरसी कायद्याला आम्ही संसदेत विरोध केला. या कायद्यामुळे मोदी सरकार जातीधर्माच्या नावावर देशाचे १९५० साली पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांनी तयार केलेल्या देशाच्या संविधानावर घाला घालण्याची त्यांची कुटील नीती आहे. आज शरद पवार यांचा महाआघाडीचा प्रयोग देशात यशस्वी झाल्यावर भाजपची देशातील हुकुमत संपेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांबरोबर असून त्यांच्या हिताचे रक्षण करण्यास सज्ज आहे.
नवाब मलिक म्हणाले की, देशविरोधी काम भाजप करत आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेची जबाबदारी स्वीकारली असून, राज्यात कोणावर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. दरम्यान, या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरेखा पेडणेकर, अल्पना पेंटर, पालिकेतील गटनेत्या राखी जाधव, अजित रावराणे, हरीश सणस, सोहेल सुभेदार, प्रभाकर चाळके, अमृता साळवी, नितीन कदम, माजी अतिरिक्त पोलीस आयुक्तए.ए. खान उपस्थित होते.