मुंबई : आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवापिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांना ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ असे नाव देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये ही केंद्र सुरू होणार असून, या उपक्रमाचा लाभ युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री यांनी केले.
‘मेघदूत’ या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राच्या ‘ऑनलाइन’ उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे उपस्थित होते. (वा.प्र.)