डोंगराळ भागातील ज्येष्ठांंच्या लसीकरणासाठी तरुणाईची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:06 AM2021-05-22T04:06:59+5:302021-05-22T04:06:59+5:30
मनीषा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहाटेच उठून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावायच्या आणि आपला नंबर येईपर्यंत डोंगराळ भागातील ...
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहाटेच उठून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावायच्या आणि आपला नंबर येईपर्यंत डोंगराळ भागातील वयोवृद्ध नागरिकांना खाली उतरवत आणून त्यांना त्या लसीकरण केंद्रापर्यंत न्यायचे. त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांना घरी नेऊन सोडायचे असे करत भांडुपमधील तरुणाईने सामाजिक बांधिलकी जपत येथील डोंगराळ वस्तीत रहाणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांच्या लसीकरणाचा ध्यास घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या रोगाचा वाढता प्रादुर्भाव, अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा आणि डोंगराळ भागात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठांचे लसीकरणासाठी हाल होत असलेले बघून भांडुपमधील तरुणाई एकत्र आली. त्यांनी या वयोवृद्धांच्या मदतीचा विडा उचलला. भांडुपमध्ये राहणाऱ्या यतीन सावंत यांच्या पुढाकाराने तरुणांनी एक ग्रुप तयार केला.
सावंत सांगतात, कोरोनाने आधीच पर्यटन आणि सहलींना ब्रेक लागला होता. खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीलाही याचा फटका बसला. अशात थांबून असलेल्या वाहनाचा वापर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी नेण्यासाठी झाल्यास तेवढीच मदत होईल, म्हणून त्यांच्या १७ सीटर बसचा वापर डोंगराळ भागातील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणा पर्यंत पोहचविण्यासाठी सुरु केला. हळूहळू यात गाड्यांची भर पडत गेली आहे.
भांडुपमध्ये एकच केंद्र असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत होती. त्यांना पर्यायी मुलुंड, भांडुप, घाटकोपर मधील केंद्राच्या खेपा माराव्या लागत होत्या. म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाना जेथे साठा उपलब्ध आहे अशा ठिकाणी नेत लसीकरण
करत असल्याचे सांगितले. गेल्या दहा दिवसांत ३५० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले.
....
रिक्षा चालक महिलाही दिमतीला
ज्येष्ठ नागरिकांची ने आण करण्यासाठी भांडुपच्या महिला रिक्षा चालकही पुढाकार घेताना दिसत आहेत. रिक्षाचालक नेहा पेटकर, मनीषा मोरे, विशाखा तांबे, स्नेहल परब,
यांचीही धावपळ पाहावयास मिळत आहे.
..
व्हाॅट्सॲप ग्रुपवर ज्येष्ठांची नोंद
तरुणांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा व्हाॅट्सॲप ग्रुपही तयार केला आहे. या ग्रुपद्वारे किती जणांनी पहिला डोस आणि दुसरा डोस घेतला याबाबत नोंद ठेवण्यात येत आहे.
...
नोकरी सांभाळून आजी आजोबांसाठी धडपड ...
प्रथमेश सावंत, पंकज गावडे, प्रथमेश खोत, निलेश नेवगे, प्रदीप ठाकूर, श्रेयश रेशीम, रमेश गोरुले हे तरुण नोकरी, अभ्यास सांभाळून ज्येष्ठांसाठी धावपळ करत आहे.
...
जिथे घरचे दुर्लक्ष करतात, तिथे मिळतोय आधार
जिथे घरचे दुर्लक्ष करतात, तिथे या तरुणांचा आधार होत असल्याचे काही ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे तरुणाईच्या कामामुळे लसीकरण अधिक सोपे आणि न त्रास घेता होत आहे.
....